पुणे जिल्हा: खासदार सुळे यांनी व्यापार्यांशी साधला संवाद

इंदापूर – बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुका आणि शहरातील व्यापारी बंधूना व्यवसाय करण्यासंबंधी येणार्या अडचणी ऐकून घेतल्या. यावेळी इंदापूर शहर व्यापार्यांनी केलेल्या मागण्यांवर तातडीने निर्णय करून त्यावर योग्य ती उपाय योजना करणार्या असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
मंगळवारी (दि. 16) खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौर्यावर होत्या. इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात शहरातील व्यापार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी इंदापूर शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा, सचिव मेघश्याम पाटील, सहसचिव दिलीप कासार, कार्याध्यक्ष नंदकुमार गुजर, उपाध्यक्ष संदिप वाशिंबेकर व इंदापूर शहर व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यापार्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठ ही परिसरातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांवर अवलंबून असल्याने माढा, माळशिरस या तालुक्यांमधील बॉर्डरवर असणारे ग्राहक यांना दळणवळणाची सोय असल्यामुळे चालतो; परंतु अगदी जवळ असणारा करमाळा तालुका व भीमा नदीच्या काठावर असणारी खेडी ही इंदापूरला जोडली गेली तर त्याचा फायदा बाजारपेठेला नक्कीच होणार आहे.
त्यासाठी मौजे कालठण चिकलठाण हा भीमा नदीवरील पूल झाला तर तेथील नागरीक आणि इंदापूर तालुक्याला करमाळा आणि पुढे नगर जिल्हा हा जोडला जाईल. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल. व्यापार वृद्धीच्या दृष्टीने याचा भविष्यात उपयोग होईल. इंदापूर शहरामध्ये केंद्र सरकारची योजना हॉकर्स झोन मार्केटची उभारणी करणे काळाची गरज आहे. तसेच शहरातील मुख्य बाजारपेठ अरुंद असलेने बाजारपेठेत असणारे होमगार्ड ऑफिसचे जागी बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावे.





