Pune District : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या मुलाला दिले आईने नवजीवन

-मेंगडेवाडीतील मातेच्या मायेमुळे कुटुंबावर सुखाची छाया
संतोष वळसे पाटील
मंचर – सध्याच्या युगात आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे घडली आहे. मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या असताना मुलाला आईने आपली एक किडनी देऊन त्याला नवीन आयुष्य जगण्यासाठी बळ दिले. आईने मुलासाठी किडनी दान केल्याने मुलाचे प्राण वाचले असून मातेच्या मायेमुळे कुटुंबावर पुन्हा सुखाची छाया पसरली.
मेंगडेवाडी येथे बन्सी मेंगडे, उषा मेंगडे हे शेतकरी दांपत्य राहत असून त्यांना दोन मुले सुनील मेंगडे, राहुल मेंगडे व एक मुलगी मंगल अशी तीन मुले असून मुलगी मंगल हिचा विवाह झाला आहे. तर दुसरा मुलगा राहुल मेंगडे याचे काही वर्षांपूर्वी अकस्मात निधन झाले. कुटुंबाची सर्व जबाबदारी धाकटा मुलगा सुनील मेंगडे यांच्यावर आली. तो शिरूर तालुक्यातील जातेगाव येथे एका कारखान्यात काम करत असताना शनिवार-रविवार गावी येऊन कुटुंबात वेळ घालवत होता. कामावर दुचाकीवर जात असताना त्रास होत असल्याने त्यांनी चार चाकी गाडी घेण्याचा निर्णय घेतला.२०२४ मध्ये त्यांनी चार चाकी गाडी घेतली घरात सगळे आनंदी होते.
मात्र, त्याच दिवशी नियतीने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले.आनंदात असलेले कुटुंब दुःखात बुडाले. सुनील मेंगडे याची तब्येत बिघडली. तपासण्या केल्या असता सुनील यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्याचे समजल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. डॉक्टरांनी आशा दाखवल्यावर त्याला किडनी देण्यासाठी त्याची आई उषा,पत्नी सोनल, बहीण मंगल पुढे आले. मात्र, तपासणीमध्ये पत्नी व बहिणीची किडनी मॅच झाली नाही. तर आईची किडनी मॅच होत असल्याने आईने तात्काळ मुलाला आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हाॅस्पिटलचा खर्च मोठा होता, पुढे औषधोपचारासाठीही पैसा लागणार होता.
अशा वेळी बन्सी मेंगडे यांनी शेताचा एक तुकडा विकून काही पैसे जमवले. याबाबत मेंगडेवाडीचे माजी सरपंच भरत फल्ले यांनी ही बाब माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहायक रामदास वळसे पाटील यांच्या कानावर घातली. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून सुनील मेंगडे याच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खर्चासाठी पुणे येथील एका नामांकित हॉस्पिटलशी बोलून बील कमी करण्यासाठी मदत केली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांचे मदत होण्यासाठी प्रयत्न केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाहेरील व्यक्तीचा संसर्ग होऊ नये म्हणून दोघेही आई व मुलगा हे सहा महिने कुटुंबापासून अलिप्त राहत होते.सध्या दोघांची प्रकृती उत्तम असून उषा मेंगडे हे शेतातील काम करतात तर सुनील मेंगडे हा पुन्हा एकदा कंपनीत कामावर जात आहे.
कठीण समय येता आधार तुमचाच…
मेंगडेवाडी येथील माझा मुलगा सुनीलच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या.त्यांच्या आईने त्यांला एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला .त्यासाठी कुटुंबाने पैशाची तजवीजही केली.परंतु खर्च मोठा असल्याने रक्कम कमी पडली.ही बाब माजी सरपंच भरत फल्ले यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीय सहायक रामदास वळसे पाटील यांची भेट घेवून सुनील याला पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.अडचणीत असलेल्या रुग्णांना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नेहमीच तत्परतेने मदत करतात. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
-बन्सी मेंगडे,सुनीलचे वडील मेंगडेवाडी.
बन्सी मेंगडे यांचे कुटुंबीय शेतकरी, त्यांच्यावर याघनेने आभाळ कोसहे होते. अशा कठीण प्रसंगी त्यांना धीर देणे, सहकार्य करणे महत्त्वाचे होते. किडनी रोपण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हसू यातच सर्व काही आले.
-रामदास वळसे पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक.





