Pune District : धाकटे पंढरपूर येथे लाखाहून अधिक भाविकांनी घेतले विठूरायाचे दर्शन

कळस – इंदापूर तालुक्यातील धाकटे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त रविवार, दि.६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी देवाची महापूजा, आरती, काकडा, भजन , किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला.
येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त भक्तिरसात फुलून गेलेला असतो. परिसरातील दहा ते बारा गावातील दिंड्या एकादशीला येथे हजेरी लावतात. कळस येथून देवाची मानाची पालखी व दिंडी येथे दाखल होते. दरम्यान, भाविकांना देवदर्शनासाठी दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली होती.
भाविकांच्या सेवेसाठी सुमारे ५० स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. या शिवाय भाविकांच्या वाहनांसाठी मंदिराच्या दोन्ही बाजूला प्रशस्त पार्किंगची सोय केली करण्यात आली होती. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक विद्युत रोषणाई यांसारखे सजावटीचे काम करण्यात आले आहे. भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करण्यात आले होते. दरम्यान आलेल्या सर्व भाविक भक्तांना फराळ वाटप करण्यात आले.
प्रशस्त रस्ता हवा
विठ्ठलवाडीतील या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे येण्यासाठी कळस, पळसदेव, रुई या गावांकडून येण्यासाठी स्वतंत्र रस्ते आहेत. मंदिर परिसरात बागायत शेती असल्याने हे रस्ते तोकडे पडत आहेत. याशिवाय पुणे सोलापूर महामार्गाकडून येणारा रस्ता हा वनक्षेत्रातून येत असल्याने तेथे पक्का रस्ता तयार झालेला नाही. गतवर्षी रुई गावाकडून येणारा रस्ता मंदिर परिसरात वाढविला आहे. मात्र, त्या रस्त्याचेही पक्के काम झाले नाही.





