पुणे जिल्हा : महाराष्ट्राला सर्वाधिक धोका मोदी, शाहांचा-संजय राऊत

बाबाजी कळेंच्या प्रचारार्थ चाकणमध्ये सभा
राजगुरूनगर – शरद पवार यांनी जगातल्या ऑटो मोबाईल कंपन्या महाराष्ट्रात आणल्या; मात्र महाराष्ट्रातील उद्योग, नोकर्या गुजरातकडे चालल्या आहेत. उद्या चाकणवर डोळा असेल. मराठी माणसाचे दोन शत्रू त्यांना गाडल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्राला सर्वाधिक धोका नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चाकण येथे केले.
खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ चाकण येथे सभा झाली. या सभेत राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार बाबाजी काळे, जुन्नर विधानसभेचे सत्यशील शेरकर, सुरेश घुले, सुरेश भोर, सुलभा उबाळे, विजया शिंदे, अतुल देशमुख, राजमाला बुट्टे पाटील, विजय डोळस, हिरामण सातकर, सुधीर मुंगसे, अशोक खांडेभराड, देवेंद्र बुट्टेपाटील, विजयसिंह शिंदे, राजू जवळेकर, वंदना सातपुते, नीता आल्हाट, सुरेश भोर, संतोषनाना डोळस, राहुल गोरे, सुरेश चव्हाण, मनीषा सांडभोर, श्रद्धा सांडभोर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले की, महालक्ष्मी योजना अंतर्गत तीन हजार रुपये दर महिना महिलांना देणार,सगळ्या महिलांना प्रवास फुकट, 3 लाखापर्यंत कर्ज माफी, तरुणाच्या हाताला काम देण्याची जबाबदारी असून नोकरी नाही तोपर्यंत 4 हजार महिना, प्रत्येक कुटुंबाला 25 लाख आरोग्य विमा देण्याचे जाहीर केले. बाबाजी काळे एक उत्तम उमेदवार सभ्य सुसंस्कृत वारकरी आहे.
आजच्या सभेवरून ही जागा शिवसेनेने जिंकलेली आहे. मशाल पेटली तर महाविकास आघाडी उजळून निघेल. शरद पवार हे आम्हला बाळासाहेबांच्या स्थानी आहेत, असेही त्यांनी नमूद केले. पुरेशा वेळेअभावी उमेदवार बाबाजी काळे यांचे भाषण झाले नाही. दरम्यान अतुल देशमुख, विजय डोळस, सुलभा उबाळे, देवेंद्र बुट्टे पाटील, रामदास धनवटे आदींनी मनोगत व्यक्त केले.





