पुणे जिल्हा : आमदार कुल यांच्याकडे जिल्हा समन्वयकपदाची धुरा

जिल्ह्याचे नेतृत्व आता दौंडकडे
दौंड – भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार कुल यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण हा संपूर्ण जिल्हा होता. यावर्षीपासून यामध्ये बदल करीत दक्षिण व उत्तर, असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली आहे. त्यामुळे दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार कुल यांच्याकडे देण्यात आली आहे. यावरून एक प्रकारे आमदार कुल यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आमदार कुल यांच्याकडे यापूर्वी बारामती लोकसभा निवडणूकप्रमुख पदाची जबाबदारी असून आत्ता पूर्ण ग्रामीण जिल्ह्याची समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यामुळे बळ मिळणार आहे.
निवडीनंतर आमदार राहुल कुल म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने माझ्यावर संघटनात्मकरुपी समन्वयाची जबाबदारी दिली असून ही दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे. केंद्र व राज्य सरकारची विकासाची कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचविले जातील, याबाबत संघटनात्मक रचना करून ही कामे पोहोचविली जातील.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारी नेमणुकीनंतर पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर जिल्हा समन्वयकाची जबाबदारी दिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानून त्यांनी दिलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.





