पुणे जिल्हा : आमदार भरणे यांनी दिव्यांग बांधवांचा प्रश्न सोडवला

इंदापूर : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे हे सामान्य जनतेचे आमदार म्हणून गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिले आहेत. कोणत्याही सामान्य जनतेचे काम सहजगत्या ते मार्गी लावतात हे त्यांची खासियत आहे. यामुळेच निमसाखर गावातील दिव्यांग बांधव ज्ञानदेव रंगनाथ भुजबळ (वय 75) यांनी आपली दिव्यांग गाडी थेट आमदार भरणे यांच्या गाडीच्या समोरच आणून लावली. या गावातील कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदार भरणे यांनी सगळे सोडून, ज्ञानदेव भुजबळ यांची भेट घेत लगेच तलाठ्याला बोलवून सर्व शासनाचे लाभ भुजबळ यांना द्या. असे आदेश तहसीलदारांना दिले.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील सामान्य जनता हीच खरी, माझी राजकीय ताकद आहे. याच्यांच आशीर्वादाने मी आज या पदावर आहे. तालुक्यातील कोणताही गरीब मजूर व्यक्ती थेट माझ्याशी संपर्क करतो. मी कधीही कोणत्या गावाचा असे विचारत नाही. थेट त्यांचे काम मार्गी लावतो. राज्य सरकार व केंद्र शासनाने गरीब जनतेसाठी अनेक लहान-मोठे योजना दिलेले आहेत.
तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत तसेच विकास सोसायटीच्या पदाधिकार्यांनी अशा महत्त्वाच्या शासनाच्या योजना गोरगरिबांना मिळवून देण्यासाठी मदत करावी. यासाठी मी पाहिजे ते सहकार्य करायला तयार आहे. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते वीरसिंह रणसिंग, तसेच निमसाखर गावचे तलाठी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





