पुणे जिल्हा : खरीप हंगामातील बाजरीचे पिक जोमदार

लोणी देवकर : इंदापूर तालुक्यात चालू खरीप हंगामातील बाजरीचे पिक पोषक हवामान व समाधानकारक पाऊसामुळे जोमदार आले आहे. सध्या बाजरीचे पीक हे फुलोरा ते परिपक्व होण्याच्या अवस्थेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी बाजरीचे पीक उपलब्ध क्षेत्रावरती घेतलेले दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यात ऊस व फळबागांमुळे गेल्या काही दशकांपासून खरीप हंगामातील बाजरी पिकाखालील क्षेत्र घटलेले आहे. तरीही अडीच ते तीन महिने एवढ्या कमी कालावधीचे हे पिक अनेक शेतकरी बांधवांनी घेतलेले आहे.
रस्त्याने ये-जा करताना ठिक-ठिकाणी शेतात डौलणारे बाजरीचे पिक सध्या दिसून येत आहे. अलीकडच्या काळात आहारामध्ये बाजरी धान्याचे महत्व वाढल्याने बाजारामध्ये उत्पादिस बाजरीस चांगला बाजारभाव मिळत आहे.
तसेच या पिकाच्या काढणीनंतर सरमाडाचा उपयोग हा जनावरांसाठी वाळलेला चारा म्हणूनही दुध उत्पादक शेतकरी करीत आहेत. त्यामुळे चारा टंचाईवरही काही प्रमाणात मात करता येत असल्याची माहिती शेतकर्यांनी दिली.





