पुणे जिल्हा : एमआयडीसी, शिक्षण संकुल उभारणार

आमदार राहुल कुल यांची ग्वाही
पारगाव – दौंड तालुक्यात तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी एमआयडीसी व मुलांच्या शिक्षणासाठी भव्य असे शैक्षणिक संकुल उभे करणार आहे, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार, आमदार राहुल कुल यांनी दिली. पाटस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार कुल यांनी पत्रकारांशी बोलताना पुढील पाच वर्षांच्या व्हिजनबद्दल दौंडचे विकासात्मक मॉडेल उलगडून सांगितले.
कुल म्हणाले, खरेतर विकास कामाच्या आधारावर आपला आमदार निवडला जावा. मला विकासकामे विचारता विकासकामे सांगायला लागलो तर ४० ते ४५ मिनिटे वेळ पुरत नाहीत. समोरच्यांना विकासकामांवर बोलायचे म्हटल्यास दोन, चार व फार तर सात मिनिटे जास्त होतात. भीमा पाटस कारखान्याच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर कुल म्हणाले की, भीमा पाटस कारखाना चालू झाला हेच मोठे दुःख समोरच्यांना झाले आहे. कारखाना सहकारी आहे. म्हणूनच आपण जनरल मिटींगला आला होता. एका बाजूने कारखान्यावर टीका करायची अन् निवडणुकीत मात्र अर्ज भरायचा नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला.
आपण विकास कामावर बोलायला पाहिजे असे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे, यावर कुल म्हणाले की, सोमवार (दि.१८) वरवंड येथील देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर आपण सर्व पत्रकार बंधूनी आम्हाला आमंत्रित करावे. तुम्ही सांगाल ते ठिकाण व वेळ मला मान्य असेल. समोरासमोर होऊन जाऊ द्या. मी हे आव्हान स्वीकारले आहे. त्यांनी त्यांच्या कामाची यादी आणावी, असे कुल यांनी विरोधकांना आव्हान दिले.
कुल म्हणाले की, मागील दहा वर्षात आपण केलेल्या रस्ते, वीज, पाणी यावर केलेल्या कामाची ही पावती असून यावरून एक प्रकारे माझे अप्रत्यक्षपणे योगदान त्यांनी मान्य केले आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
कुल म्हणाले की, दौंड तालुका पुण्याला जोडण्यासाठी सुमारे ६००० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. ते काम अंतिम टप्यात आले आहे. तालुक्यातील जनता सूज्ञ आहे. शिरवाळ भाषा येथे चालत नाही, अशी कोपरखळी कुल यांनी यावेळी विरोधकांना लगावली.





