पुणे जिल्हा : मेहता हॉस्पिटलने दिले मुलीला जीवदान

१४ वर्षाच्या मुलीच्या पोटातून तीन किलोची गाठ काढली : बारामतीत यशस्वी शस्त्रक्रिया
बारामती – न कळलेला जीवघेणा आजार घेऊन एक १४ वर्षांची मुलगी मेहता मेडीकेअर हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रिविकार तज्ज्ञ डॉ. विशाल मेहता यांच्या ओपीडीमध्ये पोट फुगले आहे, दम लागतोय, जेवण जात नाहीये, ही तक्रार घेऊन आली. डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी, सी. टी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर डॉ. विशाल मेहता यांनी त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून व तपासणीवरून काढलेला निष्कर्षाची निश्चिती तो रिपोर्ट करीत होता. स्प्लीनच्या (प्लीहा) गाठीचे निदान झाले.
डॉ. मेहता यांनी रिपोर्ट बघून पुण्याचे अनुभवी कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मनोज डोंगरे यांच्यासोबत चर्चा करून त्या मुलीला लगेच शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, हे तिच्या पालकांना सांगितले. डॉ. विशाल मेहता यांच्या आत्त्मविश्वास पूर्ण बोलण्याने रुग्णावर आणि पालकांवर सकारात्मक परिणाम साधला जात होता. आपल्याला निदान झालेल्या आजाराशी दोन हात करण्यासाठी ती १४ वर्षाची मुलगी ऍडमिट झाली.
आठवड्यापूर्वी ती आली. तेव्हा सुद्धा तिला दम लागत होता. तेंव्हा साधारण वाटणाऱ्या त्या आजाराने आता प्राणघातक रूप धारण केले होते. रुग्णाच्या फुगलेल्या पोटामध्ये ही गाठ फुटून रुग्ण दगावण्याची देखील दाट शक्यता होती. टळणारा प्रत्येक क्षण रुग्णाच्या जीवन-मरणातील अंतर कमी करीत होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मनोज डोंगरे, डॉ. विशाल मेहता, भूलतज्ज्ञ डॉ. कुटे, डॉ. निकिता विशाल मेहता यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तत्काळ गुंतागुंतीचे असणारे स्पलिनेक्टमी ऑपरेशन सुरू केले. 35 सेंटिमीटर व 3 किलो वजनाची ती गाठ काढण्यात आली जी खरोखर खूप दुर्मिळ आणि जीवघेणी देखील असते.
मेहता, मेडीकेअर हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटर मधील अद्ययावत सुविधा, यंत्रणा व अंगभूत कौशल्य या सर्वांच्या जोरावर निष्णांत डॉक्टरांच्या कसबी हातांनी रुग्णावर शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे केली. काही तासांनी ती शुद्धीवर आली. एक फार मोठे येऊ घातलेले जीवघेणे अरिष्ट टळले होते. रुग्ण आता पूर्वीसारखेच निरामय आयुष्य जगू शकणार होता. ६ दिवसांनी रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला.
रुग्णाचे मनोधैर्य खचू दिले नाही
माहीत नसलेल्या आजाराबद्दल डॉ. विशाल मेहता यांनी रुग्णाचे मनोधैर्य खचू नये म्हणून युक्तीने केलेले संभाषण, बोलण्यातून दिलेली प्रेरणा यामुळे गंभीर अशा आजारातून आपली मुलगी बाहेर पडली, याबद्दल मुलीचे पालक शतशः ऋणी होते. त्यांनी साश्रूनयनांनी डॉक्टरांचा निरोप घेतला. मेहता, मेडीकेअर हॉस्पिटलचा शस्त्रक्रिया विभाग आणखी एका रुग्णाचे जीवन वाचवणाऱ्या उपचाराचा साक्षीदार झाला .





