Pune District : माउलींचे वाल्हेनगरीत जल्लोषात स्वागत

परतीच्या प्रवास : समाज आरतीस वैष्णवांचा मेळा
वाल्हे – अभंग गात, पालखी सोहळ्याचे वाल्हेनगरीत आगमन झाले. आषाढी एकादशीच्या पांडुरंगाच्या दर्शनानंतर मंगळवारी (दि. 15) श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ते पुणे जिल्ह्यातील वाल्हे (ता.पुरंदर) हे सर्वात कमी अंतराचा टप्पा मंगळवारी होता.
वाल्हे गावच्या वेशीवर सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास रिमझीम पाऊसाच्या सरीत गावच्या वेशीवर सरपंच अतुल गायकवाड व वाल्हेकर ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान,सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याचे आगमन रयत शिक्षण संस्थेच्या महर्षि वाल्मिकी विद्यालयामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये माउलींचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, संताजी महाराज जनागडे, चैतन्य महाराज ओतूर, सद्गुरू बाबाजी महाराज चांगावटेश्वर आदी पालखींचेही या ठिकाणी आगमन झाले.
माउलींच्या पालखीचे महर्षी वाल्मिकी विद्यालयात आगमन होताच, वाल्हेकर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन ज्ञानोबा तुकाराम जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये भगव्या पताका उंचावत ग्रामस्थांनी पालखीवर पुष्पवृष्टी करीत पालखी खांद्यावर नाचवत मुक्कामी ठिकाणी आणण्यात आली. यावेळी,भाविकांच्या उपस्थितीत व वरुणराज्याच्या साक्षीने, समाज आरती करण्यात आली. यावेळी,वाल्हे गावचे मांडके कुटुंबीय यांच्या हस्ते माउलींच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.
आज सासवड मुक्कामी
सायंकाळी अडाचीवाडी येथील भजनी मंडळाचा जागराचा कार्यक्रम झाला. पालखी सोहळा बुधवारी (दि. 16) पहाटे तीन वाजता सासवड मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे.
वाल्हे (ता. पुरंदर) : पालखी सोहळा विसावल्यानंतर समाज आरतीस उपस्थित वैष्णव व ग्रामस्थ.





