रंजन तावरे यांचा अजित पवार यांच्यावर घणाघात बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ऊस उत्पादक सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीत प्रचंड दडपशाही करून सभासदांवर दबाव आणला. सत्तेचा वापर करून सभासदांवर दडपशाही केली आहे, अशी घणाघाती टीका सहकार बचाव पॅनलचे प्रमुख, माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केली. तावरे म्हणाले, मंत्र्यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी सोळा सभा घ्याव्या लागल्या. आठवडाभर बसून राहावे लागले. घरोघरी जावे लागले. लक्ष्मीदर्शन द्यावे लागले. जिल्हा बँक रात्री अकरा वाजता उघडून पाकिटे भरून शेतकऱ्यांना पोचवावी लागतात. पैशांचे वाटप करण्याची वेळ आली. उपमुख्यमंत्री व क्रीडामंत्र्यांना सभासदांनी गुडघ्यावर आणले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उपमुख्यमंत्र्यांनी माळेगावच्या निवडणुकीसाठी सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला. स्वतःचा पॅनेल निवडून आणण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला, यातच आम्ही आमचा विजय समजतो. उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानुसार सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदांना द्यावा, हीच अपेक्षा.