पुणे जिल्हा : गॅस चोरी करताना भीषण स्फोट ; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

खेड : गॅसच्या कंटेनरमधून गॅस चोरी करताना भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही घटना आज पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली. आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे.
सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हा गोरखधंदा एका ढाब्याच्या (राजस्थान हॉटेल) समोर सुरू होता. एका कंटेनर मधून घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरू होतं.
अशात गॅसचा स्फोट झाला, तीन ते चार टाक्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आहेत. या स्फोटाने मोठी आग लागली होती. या आगीत ढाब्यासह तिथं पार्क असणाऱ्या इतर वाहनांना ही मोठी आग लागली.
तसेच स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचे ही नुकसान झाले आहे. शेल पिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. चाकण पोलीस घटनेचा तपास करतायेत. गेल्या वर्षी अशीच धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये ही घडली होती. तेंव्हा ही गॅस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.





