कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कंपनीतील कामगार सागर रणभावरे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. जखमी कामगारास उपचारासाठी दौंडमध्ये दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्याला दौंडहून पुण्याला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अल्काईल अमाईन्स या कंपनीत सकाळी डिस्टिलेशन विभागात रिबॉयलर मधून रेसीड्यु ट्रान्सफर झाल्यानंतर टॅंक टी-४४२० ही 2000 लिटरची टाकी फुटून मोठा आवाज होऊन स्फोट झाला. या विषयीची माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी अंकुश खराडे यांनी दिली आहे. घटनास्थळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे,सुरक्षा अधिकारी अंकुश खराडे, दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, कुरकुंभ पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.