विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयाची सक्ती : पालकांच्या डोळ्यात धूळफेक पुणे – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्व आनंदोत्सव होत आहे. परंतु मराठी भाषेच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मात्र मराठी भाषेची अहवेलना होत आहे. विद्यापीठ संलग्न असलेल्या शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी विषय जाणीवपूर्वक दिले जात नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने मराठी विभाग बंद केला आहे, असे सांगत मराठी विषयाऐवजी दुसरा विषय घेण्याची सक्ती केली जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयाची संलग्नता रद्द करण्याची मागणी विद्यापीठाकडे करण्यात येत आहे. कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी नुकतीच विद्यापीठाकडे मराठी विषय शिकवण्यापासून महाविद्यालय रोखत असल्याची लेखी तक्रार केली होती. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी विषय घेता आला नाही. शिवाय संबंधित विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापिकेला सुद्धा नोकरी गमवावी लागली. विद्यापीठाच्या एका समितीने संबंधित महाविद्यालय चुकीचे वागत असल्याचा निर्णय देऊनही या महाविद्यालयाने मराठी विषयाबाबत चुकीची भूमिका घेतली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची संलग्नता रद्द करावी. या मागणीचे निवेदन कल्पेश यादव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना दिले आहे.यासंदर्भात पुणे विद्यापीठाने येत्या आठ दिवसात विद्यापीठाने खुलासा करावा अन्यथा युवासेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत महाविद्यालयाशी संपर्क केले असता, ते होऊ शकले नाही. विद्यापीठाविरोधात मोठे आंदोलन करणार विद्यार्थ्यांना मराठी विषय घेण्यापासून संलग्न महाविद्यालय रोखत असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. या विद्यापीठाशी संलग्न कस्तुरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाची मजल मराठी विषय बंद पाडण्यापर्यंत या गेली आहे. त्यामुळे विद्यापीठावर कठोर कारवाई करावी अन्यथा विद्यापीठाविरोधात मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादवयांनी दिला आहे.