Pune District : मराठा समाज पदाधिकाऱ्यांकडून मंचर येथे लाडूचे वाटप

मंचर – मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दीर्घकाळापासून मराठी आरक्षणाबाबत केलेल्या मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्याने संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोषात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. समाजबांधवांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला.
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने चौक दणाणून गेला होता. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या लढ्याचा ऐतिहासिक विजय म्हणून समाजातील ज्येष्ठ व तरुणांनी एकत्रितपणे समाधान व्यक्त केले.
यावेळी वसंतराव बाणखेले, सुनील बाणखेले, अजय घुले, दत्ता गांजाळे, दत्ता थोरात, सुहास बाणखेले, प्रवीण मोरडे, जे.के. थोरात, बंटी थोरात, विश्वास थोरात, बाजीराव मोरडे, सुरेश निघोट, संजय चिंचपुरे आदी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचे कौतुक केले.
या आनंद उत्सवामुळे मंचर शहरात उत्साहाचे वातावरण पसरले असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस यश आल्याबद्दल समाजबांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
….





