Pune District : रांजणगाव गणपतीत मराठा बांधवांचा जल्लोष

गुलाल उधळून ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाचे वातावरण
रांजणगाव गणपती- मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळताच आणि सरकारकडून मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर होताच रांजणगाव गणपती येथे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
बसस्थानक परिसरात मराठा बांधवांनी गुलाल उधळून, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला. मराठा क्रांती मोर्चा की जय, मनोज जरांगे पाटील अमर राहो अशा घोषणांनी संपूर्ण देव परिसर दणाणून गेला. या जल्लोषात गावोगावीचे तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उपस्थित मराठा बांधवांनी भावना व्यक्त करताना सांगितले, हा आनंद आमच्या हक्काच्या विजयाचा आहे. हे यश मनोज जरांगे पाटील यांच्या अथक प्रयत्नांचे आणि मराठा समाजाच्या ऐक्याचे फलित आहे. रांजणगाव गणपतीसह शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करून उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.





