पुणे जिल्हा : मांडेकर यांच्या विजयाचा राजगड तालुक्यात जल्लोष

विंझर – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या फरकाने निवडून आलेले मुळशी तालुक्यातील विजयी झालेले महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मिळवलेल्या विजयाने वेल्हे (राजगड) तालुक्यातील त्यांच्या विविध गावातील महायुतीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आहे.
तर दुसऱ्या बाजूला गेली ३ दशक काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ असणाऱ्या थोपटे कुटुंबीयांनी भोर वेल्हे मुळशी मतदार संघातील राखलेल्या गडाला खिंडार पडल्याने माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. पहिल्यांदाच भोर विधानसभेमध्ये मुळशी तालुक्याचे नवनियुक्त आमदार शंकर मांडेकर यांची वर्णी लागल्याने मुळशी तालुक्याबरोबर वेल्हे (राजगड) तसेच भोर तालुक्यातील शंकर मांडेकर यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. तसेच अनेक महायुतीच्या पदाधिकाऱयांनी शंकर मांडेकर यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर दुसऱ्या बाजूला आमदार संग्राम थोपटे यांच्या भोरे वेल्हे मुळशीतील समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याने भोर विधानसभेतील काही गावांमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला.
भोर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील चर्चा आणि निकालापूर्वी अनेक कार्यकर्त्यांच्या सोशलमिडीयावर झळकणारे मेसेज यावरून संग्राम थोपट हेच येणार, असे अनेक कार्यकर्त्यांमार्फत निवडणुकीचे पोल दिले जात होते. परंतु शंकर मांडेकर यांनी महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला खिंडार पाडून भोर विधानसभेचा गड जिंकला असल्याने महायुतीचे तसेच अजित पवार गटाचे समर्थक यांच्यामध्ये गगनात मावेनासा आनंद व्यक्त केला जात आहे.
शंकर मांडेकरांच्या तसेच महायुतीच्या अनेक समर्थकामध्ये सकाळी पहिल्या फेरीपासून ते अखेरच्या फेरीपर्यंत आपला जीव टांगणीला लागला होता. परंतु पहिल्या फेरीपासून ते अगदी शेवटाच्या फेरीपर्यंत जस्तोपर्यंत जसजसा शंकर मांडेकरांच्या मताचा आकडा वाढत गेला. तेव्हाच शंकर मांडेकर तसेच महायुतीच्या समर्थकांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आणि शेवटच्या फेरी अखेरीस महायुतीच्या समर्थकांनी विजयी गुलाल उधळत विजय आपलाच, अशा घोषणा देत विजयाच्या आशा पल्लवित केल्या.





