पुणे जिल्हा : गणेशोत्सव काळात मंडळांनी जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये

– अन्यथा कारवाई, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांचा इशारा
मंचर – गणेशोत्सव काळात मंडळांनी समाज प्रबोधन देखावे सादर करावे. जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये. पत्ते खेळणे, दारू पिण्याचे प्रकार करू नये, मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि विसर्जन मिरवणुकीत डिजे न लावता पारंपरिक वादयांनाच प्राधान्य दयावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी दिला.
घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील विविध गावांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते व पोलीस पाटील यांना गणेशोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर बोलत होते.ते पुढे म्हणाले, आगामी गणेशोत्सव गणेश मंडळांनी सामाजिक भावेनतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. गणेशोत्सवासाठी घालण्यात येणा-या मंडपाचा आकार रस्त्याच्या रूंदीचे एक तृतीयांशपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी,
मंडपाचे स्टेज मजबूत असल्याचे प्रमाणपत्र मंडपवाल्याकडून लिहून घेणे, आग प्रतिबंधक उपाययोजना करावी, जनरेटरची सोय तसेच बॅटरी, गॅसबत्ती उपलब्ध ठेवावी, वादग्रस्त देखावे कार्यक्रम करणे टाळावे, ध्वनिक्षेपकाचे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, मंडळांनी गणेशोत्सव काळात स्वतःचे वीज वितरण कंपनीकडून तात्पुरते मीटर घ्यावे, पत्ते खेळणे, दारू पिण्याचे प्रकार करू नये, कोणतीही संशयित वस्तु, व्यक्ति आढळून आल्यास त्वरित पोलीसांना कळवावे, जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये,
गणेशमुर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी संबंधित मंडळांची असून त्यासाठी दररोज २४ तास मंडळातील कार्यकर्ते, स्वयंसेवक नेमण्यात यावेत. गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण आणि उत्साहाचा सण आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे सर्वांना सोबत घेऊन शांततेत,मोठया आनंदाने साजरा करावा.गणेशोत्सवामध्ये अनावश्यक खर्च टाळून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसावा. शालेय विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करा. गुलाला ऐवजी फुलांचा वापर करा. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण हे उपक्रम राबवावेत, असे विविध सामाजिक उपक्रमातून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले.





