पुणे जिल्हा : घाटरस्त्यावर पथदिवे, पोलीस चौकी करा

शिवतारे यांनी वेधले पालकमंत्री, जिल्हाधिकार्यांचे लक्ष
गराडे – बोपदेव घाटात झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर घाटातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही अत्यावश्यक उपाययोजना करण्याची मागणी शिवतारे यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना तातडीने पत्रव्यवहार केलाकेली आहे.
रात्रीच्या वेळी बोपदेव घाटात व दिवे घाटात मोठ्या प्रमाणात युवक व युवती आढळून येतात. या दोन्ही घाटात रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या कट्ट्यांवर बसून अनेक जोडपी येथेे मद्यपान करतात. येथेे अशा स्वरुपाची वर्दळ वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे घाटात असलेले अंधाराचे साम्राज्य आणि निर्मनुष्य परिसर. असाच काहीसा प्रकार दिवे घाटाच्या परिसरात देखील असतो.
कधी कधी या भागात बिबटे थेट रस्त्यावर येतात. या गोष्टी लक्षात घेऊन या दोनही घाटात जिल्हा नियोजन समितीकडून पथदिव्यांसाठी तातडीने निधी मंजूर करावा. या घाटात प्रकाशव्यवस्था असेल तर जोडपी किंवा मद्यपी याठिकाणी उगाच रेंगाळणार नाहीत. याशिवाय दोनही घाटांच्या पायथ्याला किंवा सुरुवातीला पोलीस चौकी उभारून तिथे रात्रीच्या वेळी पोलीस उपलब्ध राहतील, अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस चौकी उभारण्याबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मागणी करणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांनी काळजी घ्यावी
या रस्त्यावर दोन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांनी घाट परिसरात रात्रीच्या वेळी फिरण्यास विद्यार्थ्यांना मज्जाव करावा यासाठी कॉलेज प्रशासनाशी देखील मी चर्चा करणार आहे.





