पुणे जिल्हा : शेती साधने जीएसटी मुक्त करा

आमदार बनके : अधिवेशनात आवाज उठवणार
नारायणगाव – शेतकर्यांना शेतीसाठी औषधे, खते यांसह अनेक वस्तू खरेदी करताना जीएसटी लागून जी किंमत लागते ते जीएसटी मुक्त करावी, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात शासनाकडे करणार असल्याचे आमदार अतुल बेनके म्हणाले. शेतकरी ज्यावेळी आपला शेतमाल बाजारपेठेत विकतो त्यावेळी इतर व्यापाराप्रमाणे शेतकर्याला जीएसटीचा परतावा मिळत नाही. म्हणून शेतकरी जीएसटी मुक्त होण्यासाठी अधिवेशनात मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील खते व औषधे विक्रेते तसेच नर्सरी, शेतकरी यांच्यातील समन्वय राहण्यासाठी खते, औषधे व नर्सरी दुकानवाले शेतकर्यांना मदत करीत असतात; परंतु त्यांच्यावर सरकारने काही जाचक अटी ठेवल्या आहेत.खते व औषधे उत्पादक कंपन्यांचा दोष वितरकांवर येत असेल तर ते योग्य नाही. कंपन्यांचा गुन्हा असताना दुकानदारांवर तडीपारी, मोक्का सारखा गुन्हा लावला जाऊ नये,
यासाठी अधिवेशनात आवाज उठवणार आहे; परंतु दुकानदार चुकत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या अपूर्ण असल्यामुळे शासनाने पशुवैद्यकीय पदविकाधारक पशुसंवर्धनाचे जे काम करतात त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. जसे मानवामध्ये अॅलोपॅथी,
आयुर्वेदिक, होमिओपॅथी, निसर्गोपचारासाठी स्वतंत्र परिषद आहे तसेच पशुवैद्यकीय पदविकारधारक यांना सुद्धा दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत खासगी विधेयक आमदार बेनके हिवाळी अधिवेशनात मांडणार आहेत. जुन्नर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत काम सुरू आहे; परंतु जे सर्व्हे झाले त्यामध्ये त्रुटी राहिल्या असून त्यासाठी पुरवण्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. आदिवासी भागात जलजीवन मिशनचे जे काम सुरू आहे त्या गावांना त्याचा मेंटेनन्स करणे परवडणार नाही म्हणून आदिवासी भागातील वीज बिल व मेंटेनन्स कामासाठी सरकारने त्याचा भार उचलणे गरजेचे असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.





