पुणे जिल्हा : माहूरची जीवन वाहिनी काठोकाठ

जलपूजन करून शेतकर्यांनी केला आनंदोत्सव साजरा
परिंचे – दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरणारा माहूर लघू पाटबंधारे प्रकल्प यंदाही पूर्ण क्षमतेने भरला बुधवारी (दि. 24) सकाळी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले दरवर्षी साधारणपणे जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भरणारे धरण यावर्षी पावसाने ओढ दिल्याने जुलै च्या शेवटला भरले. माहूरजाई पाणी वापर संस्थेच्या वतीने लाभार्थी शेतकर्यांनी गावचे इनामदार हेमंतकुमार माहूरकर यांच्या हस्ते जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप मान्यवर म्हणून उपस्थित होते.
2023-24 या वर्षातील राज्यातील अवर्षणाचा फटका माहूरच्या शेती शिवाराला ही बसला; परंतु माहूर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्यामुळे गावाला आणि परिसराला मोठा आधार मिळाला आहे. दरनम्यान, पुरंदर तालुक्यात भीषण टंचाई निर्माण झाली होती. 23 जुलै पर्यंत पाऊस नसल्यामुळे धरणातील पाण्याचा वापर सुद्धा सुरू होता. नवीन हंगामातील 150 एकर आडसाली उसाची लागण जुलैमध्ये याच धरणाच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे करता आली.
84 एमसीटीटी साठवण क्षमतेचा हा प्रकल्प व एक हजार एकर शेत शिवाराला पाण्याची हमी देणारा हा प्रकल्प माहूरबरोबरच पंचक्रोशीतील भीषण दुष्काळामध्ये पशु धनासाठी चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारा प्रकल्प माहूरसाठी जीवनदायिनी असल्याचे पाणी वापर संस्थेचे सचिव प्रा. राम जगताप यांनी सांगितले. यावेळी सत्यवान गोळे, हनुमंत माहुरकर, प्रा.रवींद्र जगताप, महादेव जगताप, तुकाराम जगताप, अमोल गोळे व इतर शेतकरी उपस्थित होते.





