Pune District : महायुती म्हणूनच निवडणूक लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची घोषणा
सासवड : आगामी काळामध्ये येणार्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अतिशय उत्तम संभाषण होत असून आगामी काळात होणार्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जातील असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
सासवड (ता पुरंदर) येथे माजी आमदार संजय जगताप यांच्या पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेमध्ये चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप व प्रवीण माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाची ताकद ही वाढणार आहे.
तर संजय जगताप यांनी सुचवलेले या भागातील सर्व प्रकल्प हे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत व ती आमची जबाबदारी आहे, त्यामुळे मी खात्रीने सांगतो की या भागाचा पूर्णपणे विकास केला जाईल.
भाजपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल यामध्ये महायुतीची ताकद ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.





