Pune District : आळंदीत महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका

आळंदी : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जेसीबीच्या मदतीने सरळ बे्रकर लावून खोदकाम सुरू आहे. आळंदी शहरातील सांडपाणी बंदिस्त नाल्यातून नेण्यासाठी सुरू असलेल्या या कार्यामुळे पावसाळ्यात महापूराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या रक्षा विसर्जन स्तंभास ही धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने हे कार्य थांबवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ व वारकर्यांनी केली आहे.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च केले. त्यामाध्यमातून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहे. या घाटाच्या खालून सांडपाणी वाहून जाण्याकरिता स्वतंत्र भूमिगत गटरचे नदीपात्राच्या कडेने बांधकाम करण्यात आले आहे. असे असतांना संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांच्याशी चर्चा न करता रात्रीच्या वेळी या घाटाचे बांधकाम जेसीबी मशीनने तोडफोड व खोदकाम केले आहे.
परिणाम सांडपाणी नदीत मिसळणार नाही
आळंदी शहरातील सांडपाणी पुंडलिक मंदिरालगत उघड्यावार वाहत होते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ते बंदिस्त करण्याचे कार्य सुरू आहे. ही सांडपाणी वाहिनी पुढे एसटीपी प्रकल्पास जोडली जाणार आहे. परिणाम सांडपाणी नदीत मिसळणार नाही. त्यामुळे सांडपाणी वाहिनीचे काम झाल्यावर घाटाचे काम पूर्ववत नगरपरिषदेकडून केले जाईल.
संस्थेने ज्या पद्धतीने दगडी घाट बांधकाम केले आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात महापूराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका होऊ शकतो. यामुळे घाट खचून जीवितहानी होण्याची भीती आहे. तसेच या ठिकाणी राष्ट्रपिता महत्मा गांधी यांचे रक्षा विर्सजन स्तंभास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे हे खोदकाम थांबवून पर्यायी मार्ग काढावा.
– डॉ. महेश थोरवे, संचालक, माईर्स एमआयटी
तरीही काम सुरूच
या घाटावर संस्थेतर्फे असलेल्या सुरक्षारक्षक व सुपरवायझर यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी हे लक्षात आले की डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या खासगी बांधकाम कंपनीतर्फे हे कार्य सुरू आहे. गेल्या 35 वर्षांपासून या घाटाचे बांधकाम करीत असतांना याबाबत काहीही कल्पना न देता अंधारात रात्रीच्या वेळी घाटाचे दगडी बांधकाम फोडण्याचे काम सुरू केले. संस्थेच्या सुरक्षा रक्षकांनी हे काम रात्रीच्या वेळी त्वरीत बंद करणेबाबत त्यांना विनंती केली. तथापि दुसर्या दिवशीही पुन्हा रात्रीच्याच वेळी घाटाचे बांधकाम जेसीबी मशीनने तोडण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.





