पुणे जिल्हा : महागणपती मंदिर ११००० पणत्यांनी उजळले

त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त मंदिर परिसरात दीपप्रज्वलन
रांजणगाव गणपती – श्री रांजणगाव महागणपती मंदिरात त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यामध्ये पहाटे श्रींचा अभिषेक, तसेच दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते श्री महागणपतीची महापूजा करण्यात आली.
सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. नरहरी महाराज सांगळे, आळंदी देवाची यांची किर्तनसेवा झाली, त्यानंतर मंदिर परिसरामध्ये ११००० पणत्यांचे दीपप्रज्वलन व फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. गणेशभक्त प्रगतशील शेतकरी आनंदराव दिनकरराव पाचुंदकर पाटील व नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने ११००० पणत्या व तेलडबे देवस्थान ट्रस्टला देण्यात आले, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली.
रांजणगाव गणपती या तीर्थक्षेत्रास त्रिपुरारी पौर्णिमेचे विशेष महत्त्व असल्यामुळे मंदिर परिसरात हजारो पणत्या उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवात विविध प्रकारची व आकाराची रांगोळी देवस्थान ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी रेखाटली होती. आकर्षक रांगोळी व हजारो पणत्यांचे दीपप्रज्वलन भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कॅबिनेट वनमंत्री, गोवा विश्वजीत राणे, यांच्याकडून १ किलो ५० ग्रॅम वजनाचा चांदीचा पाश श्री महागणपती चरणी अर्पण करण्यात आला.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पाटील, पुजारी, देवस्थान कर्मचारी, आदी मान्यवर उपस्थित होते.





