पुणे जिल्हा : रांजणगावात महागणपती विवाह सोहळा रंगला

मंदिर गाभाऱ्यात व परिसरात फुलांची सजावट
रांजणगाव गणपती – श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री गणेश प्रताप ग्रंथ पारायण व श्री गणेश अथर्वशीर्ष प्रवचन सप्ताहाचे आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने दि.२ जून ते १० जूनदरम्यान करण्यात आले होते. यावेळी महागणपती मंदिरात रिद्धी- सिद्धी या देवतांबरोबर महागणपतीचा विवाह सोहळा शुक्रवारी( दि.७) सायंकाळी थाटामाटात पार पडला. श्री महागणपती विवाह सोहळानिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. पारायण, प्रवचन व महाप्रसाद कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, वारकरी, भाविक तसेच गणेशभक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.
सिंदूर नावाच्या राक्षसाने ब्रम्हदेवाच्या रिद्धी- सिद्धी या दोन कन्यांना बंदिस्त केले होते. महागणपतीने त्यांची सुटका केल्यानंतर ब्रम्हदेवाच्या विनंतीवरून या दोघींशी महागणपतीने विवाह केल्याची कथा गणेश पुराणात आहे. त्यानुसार हा सोहळा साजरा करण्यात येतो.
विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड महाराज यांचे दि.२ जून ते ८ जून सायंकाळी ७.३० वाजता श्री गणेश अथर्वशीर्ष प्रवचन झाले. दि.८ जून रोजी ग्रंथदिंडी सोहळा थाटामाटात रांजणगाव पंचक्रोशीतून साजरा झाला. रविवारी (दि.९) हभप रोहिणीताई परांजपे, पुणे यांचे काल्याचे कीर्तन व सोमवार (दि.१०) रोजी ज्येष्ठ गणेश जन्मोत्सव निमित्ताने हभप चारुदत्त महाराज आफळे, पुणे यांचे सायंकाळी ४ ते ६ कीर्तन होणार आहे.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पाटील, माजी विश्वस्त, देवस्थान कर्मचारी, पुजारी तसेच ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





