पुणे जिल्हा : शिवप्रेमींच्या सहकार्यातून शिवनेरीवर महादुर्ग महोत्सव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश :आमदार बेनके
नारायणगाव – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून किल्ले शिवनेरी परिसरात महादुर्ग 2024 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन भव्य-दिव्य प्रमाणात महादुर्ग महोत्सव साजरा करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दि. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या पर्यटन विभागाच्यावतीने जुन्नर येथील शिवनेरी किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महादुर्ग 2024 महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 23) मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस जुन्नरचे आमदार अतुल बेनके, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) ए. सचिव शैला, (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दर्याखोर्यातील मावळ्यांना संघटीत करून रयतेचे स्वराज्य स्थापन केले. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. अशा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा व्हावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
उपाययोजना करा – उपमुक्यमंत्री
पर्यटन विभागाच्यावतीने दि. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान किल्ले शिवनेरीवर घेण्यात आलेला महादुर्ग महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सामाजिक स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात. यावर्षी महोत्सवाला भेट देणार्या शिवप्रेमी व दुर्गप्रेमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भातही उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.





