Pune District :पुरंदरमध्ये जनावरांमध्ये लम्पीचे थैमान

शेतकरी चिंताग्रस्त : तालुक्यातील 75 जनावरांना लागण
दिवे – जनावरांना येणारा चर्मरोग लम्पी या विषाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. संपूर्ण राज्यातील जनावरे लम्पी आजाराने त्रस्त झाले असून पुरंदर तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे. दरम्यान तालुक्यातील 75 जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून यापूर्वी एक लहान कालवड या आजाराने दगावले आहे. तसेच 24 जनावरांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. अशी माहिती तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी डॉ.अस्मिता सताळकर यांनी दिली आहे.
लम्पी हा विषाणूजन्य आजार असून यामुळे गाय वर्गमध्ये ताप येणे, पायावर सूज येणे, संपूर्ण शरीरावर 2 ते 5 सेमी आकाराचा गाणि येणे ही लक्षणे दिसून येतात. या आजाराच्या नियंत्रणासाठी गोवर्गीय वासरे, गायी, बैल यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. नियमितपणे जनावरांच्या गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून स्वतंत्र बांधावे.
त्याचप्रमाणे हा आजार विषाणूजन्य असल्याचे खात्रीशीर उपचार उपलब्ध नसल्याने पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच उपचार करावा. यामध्ये जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी घाबरून जावू नये; मात्र काळजी घेण्याचे आवाहन डॉ. अस्मिता सताळकर यांनी केले आहे.
हे उपाय कारा
आजारी जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी समतोल आहार द्यावा. हिरवा चारा, वैरण, पेंड, खनिज मिश्रणे, हर्बल लिव्हर टॉनिक, यांचा वापर करावा. अंगावरील जखमांना कापूर व खोबरेल तेल याचे मिश्रण ठिकठिकाणी कापसाने लावावे. तसेच सोडीयम हायपोक्लोराईड किंवा 1 टक्के फॉरमैलीन द्रावण वापरावे.
डास, माशी व गोबिड हे रोगप्रसारक कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक बाल्य परोपजीवी नाशकाची फवारणी करावी. यासाठी 1 लिटर पाण्यात 10 मिली करंज तेल, 10 मिली कडुनिंब तेल, 50 ग्रॅम अंगाचा साबण एकत्र करून ते मिश्रण जनावरांच्या अंगावर व गोठ्यात तीन दिवसाच्या अंतराने फवारावे.





