Pune District : दहा दिवसांत ३२ ठिकाणी लूटमारी

शिरुर तालुका भयभीत : दागिने, रोकड, दुचाकीनंतर पशूधनावर डोळा
शेरखान शेख
शिक्रापूर – शिरुर तालुक्यात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात वाढत असताना तालुक्यात सध्या तीन पोलीस स्टेशन कार्यरत असताना तालुक्यातील अनेक ठिकाणी घरफोड्यांसह दुचाक्या, जनावरे, शेतमाल चोरीला जाण्याच्या घटना लोकांची डोकेदुखी ठरत आहे. दहा दिवसांत शिरुर तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या चोऱ्यांचे तब्बल ३२ गुन्हे दाखल झाले असल्याने चोरी नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे.
शिरुर तालुक्यात दररोज एखाद्या गावामध्ये चोरीची घटना घडत असताना शिरुर तालुक्यात प्रत्येक गावामध्ये घरफोडी करुन दागिने, रक्कम यांसह महागड्या वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार वाढत आहे. कित्येकदा चोरट्यांनी बंद घरे लक्ष केली आहेत. वेगवेगळ्या स्वरूपाच्या चोऱ्या होत असताना दुचाकी, चारचाकी, शेतातील कृषी पंप, जनावरे, विद्युत रोहित्र चोरीला जाण्याच्या घटना घडत असताना आता थेट शेतातील महागडी फळे, भाजीपाला देखील चोरीला जाण्यासह नागरिकांच्या हातातील मोबाइल व महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून चोरी करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. सतत चोऱ्यांच्या घटनांमुळे तालुक्यात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
शेकडो मोबाइल चोरीचे गुन्हेच दाखल नाही
शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये चोऱ्या होत असताना अनेकदा नागरिकांचे महागडे मोबाइल चोरीला जाऊन देखील पोलिसांकडून मोबाइल गहाळ दाखल दिला जात असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील शेकडो मोबाइल चोरीबाबत कोणताही गुन्हा दाखल केला गेलेला नाही.
शिरूरची हद्द असुरक्षित
शिरुर तालुक्यात दि. २४ जून ते दि.४ जुलै या काळामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये १२, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये १७ तर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ३, अशा ३२ विविध चोरींचे गुन्हे दाखल झाले आहेत. चोरीच्या घटना घडत असताना कित्येक ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत देखील कैद झालेले समोर येऊन सुद्धा चोरट्यांची ओळख पटलेली नाही. काही घटनांमध्ये नागरिक व पोलिसांची रात्रगस्त सुरु असतानाही त्यांच्या नजरेतून चोरट्यांनी पळ काढला आहे. मात्र, चोऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या वेगवेगळ्या घटनामुळे नागरिक देखील भयभीत होत आहे.
शिरुर तालुक्यातील शिक्रापूर, शिरुर, रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरींच्या घटना लक्षात घेऊन महत्वाच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या असून रात्रगस्त वाढवलेली असून प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले.





