पुणे जिल्हा : प्रियकराचा खून करणारी प्रेयसीला जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा आदेश
लोणी काळभोर – अनैतिक संबंधानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी प्रेयसीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपसह एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पैगंबर गुलाब मुजावर (वय. ३५), असे खून झालेल्याचे नाव आहे. तर तुलसी पप्पू बाबर (वय. २९, रा. यशवंत कॉलनी, साने चौक, चिखली, पुणे), अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी समीना पैगंबर मुजावर (भोसरी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी समीना व पैगंबर हे नात्याने पती-पत्नी आहेत. पैगंबर हे पिंपरी परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काम करीत होते. आरोपी तुलसी व पैगंबर यांचे एक वर्षापासून अनैतिक संबंध होते. तुलसीने पैगंबर मुजावर यांना कामावरुन चिंचवड येथील लाॅजमध्ये भेटण्यासाठी बोलावून घेतले होते.
पैगंबर भेटण्यासाठी गेल्यानंतर पैगंबर हा लग्न करण्यास नकार देत आहे, यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. तुलसीने पैंगबर याचा ओढणीने गळा आवळून खून केला. अशी फिर्याद समीना मुजावर यांनी पिंपरी पोलिसांत दिली होती. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली होती.
हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. यात सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तुलसी बाबर हिला दोषी धरून जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले. खटल्यात सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांना पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलंग, सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक शेट्टी व हवालदार बी. टी. भोसले यांचे सहकार्य मिळाले.





