पुणे जिल्हा : मांडकी परिसरात बिबट्याची दहशत

वाल्हे : मांडकी (ता. पुरंदर) परिसरात बिबट्याची दहशत मागील काही दिवसांपासून दिवसेंदिवस वाढत चालली असून, मागील दीड महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्याची चौथी घटना घडली आहे.
मांडकी येथील, खंडोबा वस्ती येथील हरिश्चंद्र जगताप यांच्या राहत्या घराजवळील गोठ्यातील गायीच्या वासरावर बिबट्याने शनिवार मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हल्ला चढविला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कालवड ठार झाले. दरम्यान, बिबट्याकडून वारंवार होत असलेल्या हल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शेतकरी हरिश्चंद्र जगताप व येथील शेतकर्यांनी बिबट्याने एक वासरू ओढून नेलेल्या माहिती पोलीस पाटील श्रीतेज जगताप यांना दिली. दरम्यान, पोलीस पाटील जगताप यांनी तात्काळ वनविभागस याबाबत माहिती दिली. यावेळी,वनकर्मचारी हनुमंत पवार, प्रेम दाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.यावेळी, अतुल जगताप, शिवाजी मोरे, तेजपाल सणस, हर्षद जगताप, नवनाथ जगताप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.





