नागरिकांमध्ये घबराट आळंदी – आळंदी ग्रामीण हद्दीत बिबट्याचा वावर पुन्हा आढळून आला आहे. प्रथम स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या मागील बाजूस तसेच इंद्रायणी नदीच्या जवळील परिसरात थोरवे यांच्या उसाच्या शेतात स्थानिक नागरिकांना तो दिसला. सोमवारी (दि. 16) सकाळी पुन्हा त्याच परिसरात शुभारंभ सोसायटीजवळ बिबट्या आढळून आला आहे. यामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्या परिसरात पुरेशी लाइटची सुविधा नाही. लहान मुले परिसरात असतात. यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. लवकरात लवकर बिबट्यासंदर्भात योग्य उपाय योजना वनविभागाने करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. बिबट्यासोबत बछडेसुध्दा आहेत. बछडे असल्याने पिंजरा लावू शकत नाही. पिल्लांना इजा झाल्यास बिबट्या चवताळेल ते त्या आजू बाजूच्या परिसराला धोकादायक ठरू शकते, असे वनरक्षक गवळी यांनी सांगितले. मागील वेळी वनरक्षक पगडे यांनी या परिसरात नागरिकांना मार्गदर्शन केले होते.