बिबट्याने हल्ला केलेल्या ऊसतोड कामगाराचा जीव वाचला नारायणगाव – हिवरे तर्फे नारायणगाव (जुन्नर) येथील कळमजाई मळ्यात ऊसतोड चालू असताना मादी बिबट्याने ऊसतोड कामगारावर हल्ला करून १० ते १२ फूट फरफटत नेले; परंतु नशीब बलवत्तर म्हणून बिबट्याने पकडलेल्या ऊसतोड कामगाराचा जीव वाचला आहे. जुन्नर तालुक्यासह आंबेगाव, शिरूर, खेड परिसरात बिबट्याने दहशत माजवली असून, पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ले करू लागला आहे. शुक्रवारी (दि. १५) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हिवरे येथील कळमजाई मळ्यात मारूती केरभाऊ अडसरे (रा. हिवरे तर्फे नारायणगाव) यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड चालू असताना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार महादेव संजय केंदळे (वय ३०, रा. रांजणी, ता. पाथर्डी) ऊसतोड कामगारांना दोन बिबट्याचे बछडे दिसले. त्याचवेळी बछड्यांना शोधत बिबट्याची मादी तेथे आली. तोडलेल्या उसाची मोळी उचलण्यासाठी खाली वाकलेल्या महादेव केंदळे कामगारावर मादी बिबट्याने हल्ला केला व शर्ट, बनियनला पकडून दहा-बारा फूट फरफटत नेले. त्याचवेळी त्याच्यासोबत असलेला दुसरा ऊसतोड मजुर महादू डेंगळे याने आरडाओरडा करुन बिबट्याच्या दिशेने ऊस व कोयता फेकून मारला असता मादी बिबट्याने शेतमजुराला सोडून पलायन केले. दरम्यान हल्ल्यात घाबरलेला ऊसतोड मजूर महादेव केंदळे बेशुद्ध पडला व त्याच्या पोटाला उसाचे धसकट आणि मुक्का मार लागला आहे. मादी बिबट्याने हल्ला केलेल्या महादेव केंदळे याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार चालू आहे.