पुणे जिल्हा : प्रस्थापितांना डावलून कटकेंना साथ

तळेगावच्या बालेकिल्ल्यात करिष्मा : अशोक पवारांना दे धक्का
शरद पवार व अशोक पवारांना मानणारा मतदार अजित पवारांकडे
मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट पहिल्यापासून राष्ट्रवादी पक्षाचा निष्ठावंतांचा म्हणून तालुक्यात ओळख होती. यामागील काळात तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मतदाररुपी मोलाचे योगदान या गटाचे असायचे. त्यामुळे या गटातून अनेक जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, जिल्हा बँक, दूध संघ, खरेदी विक्री आदी संस्थेच्या उच्चपदही या गटाच्या पदरात पडले आहे.
मागील काळात राष्ट्रवादी पक्षात फूट पडून अजित पवार गट महायुतीत सामील झाला. त्यामुळे तळेगाव गटातील अजित पवार यांना मानणारे पदाधिकारीही त्यांच्याबरोबर पक्ष सोडून गेले. यामध्ये शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, कात्रज दूध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे, माजी उपसभापती यशवंत ढमढेरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले. त्यामुळे तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी पक्षात दुफळी निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार हा राष्ट्रवादीचा असल्याने महाविकास आघाडी व महायुतीकडून शिरूरची जागा दोन्ही राष्ट्रवादीला सुटली.
पुणे जिल्ह्यातील शिरूरचे आमदार अशोक पवार हे एकमेव आमदार शरद पवारांकडे असल्याने त्याना महाविकास आघाडीकडून उमेदवारी फायनल करण्यात आली. शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे प्रबळ दावेदार होते. अजित पवारांची अशोक पवार यांच्याविरोधात लढत देण्यासाठी मतदारसंघात चाचपणी चालू होती. भाजपचे माजी आमदार (स्व) बाबूराव पाचर्णे यांचे निधन झाल्यानंतर त्या जागी अशोक पवारांना शह देण्यासाठी मतदारसंघात भक्कम उमेदवार मिळवण्यासाठी चाचपणी चालू होती. अजित पवारांनी डावपेच आखत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक कटके यांना पक्षात घेतले. उमेदवारी जाहीर केली. शरद पवार, अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभा झाल्या. यातून मतदारसंघात राळ उठविली आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या कॉग्रेस पक्षाचे जिल्हा खजिनदार महेश ढमढेरे यांनी आमदार पवार यांच्यावर नाराजी असल्याने तसेच कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे न पटल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रचारादरम्यान शेतकरी संघटनेचे घोडगंगा कारखाना बंद असल्याने आंदोलन तर ज्येष्ठ नेते अरविंद ढमढेरे यांनी अशोक पवारांच्या सभेतील ऊस गाळपाविषयी सवाल तसेच कटके यांची मतदारसंघातील नागरिकांना मोफत उज्जैन यात्रा या सर्वांचा फटका जिल्हा परिषद गटातून माजी आमदार अशोक पवार यांना बसल्याची शक्यता आहे.
महायुतीच्या लाडक्या बहिण योजनेची लाटही फायदेशीर ठरली. तळेगाव ढमढेरेत दोन्ही पक्षाचे तालुक्याचे महत्वाचे पदाधिकारी असल्याने चांगली रंगात आली होती. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार अशोक पवार यांना तळेगाव ढमढेरेमधून ३००० पेक्षा जास्त मतांचे लीड होते. यावेळी मात्र ते लीड तोडून ८४८ मतांचे लीड कटके यांनी या गावातून घेतले.
तळेगाव गटातून २२५२ मतांचे मताधिक्य मिळाले. टाकळी भीमा वगळता सर्वच गावांनी कटके यांना आघाडी दिली. त्यामुळे तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट पवारांच्या हातून सुटतो की काय, अशी स्थिती निकालानंतर निर्माण झाली आहे.





