Pune District : माळेगावच्या शिवारात नेते, पदाधिकारी जोमात

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार : रविवार मतदान
प्रणव तावरे
माळेगाव – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. आता चार पॅनलकडे फक्त शुक्रवार (दि.२०) सांयकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार, आरोप- प्रत्यारोप करण्यास वेळ आली. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहा गटांत सभांचा धडाका लावून शिवार तापवले आहेत. माळेगावच्या मैदानात नेते, पदाधिकारी, उमेदवार जोमात आहेत. मात्र, सभासदांचा कौल कोणाला याची उत्सुकता लागून राहिली आहे.
माळेगावची निवडणूक चुरशीच्या वळणावर पोहोचली आहे. त्यामुळे वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे श्री निळकंठेश्वर पॅनल यांच्याविरोधात सहकार बचाव पॅनल, शरद पवार गटाचे बळीराजा पॅनल तसेच शेतकरी पॅनल, अशी चौरंगी लढत होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून बारामती तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन गटांत विभागली आहे.
एकसंघ राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांत विभागून या निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यात सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष रंजन तावरे यांचे पॅनल एकसंघ आहे. त्यामुळे अजित पवार यांनी या निवडणुकीत दक्षता बाळगली आहे. सर्व तालुका पातळीवरील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लावून सभांचा सपाटा लावून माळेगावचे शिवार ढवळून काढले आहे. १२ सभा घेऊन सभासदांना आश्वस्त करीत आहेत. कारखान्याचा अध्यक्ष मीच होणार आणि राज्यात टॉप पाच मध्ये माळेगावला नेऊ, अशी ग्वाही ते देत आहेत.
सहकार बचाव पॅनलकडून चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी पहिल्या दिवसांपासून सत्ताधारी अजित पवार यांच्या पॅनलला लक्ष्य केले आहे. कारखान्यावरील ४०० कोटी रुपये कर्जाचा मुद्दा ते साखर भिजल्याचा आरोप करून सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याचवेळी अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन करून प्रति हल्ला चढवित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी श्री निळकंठेश्वर पॅनल आणि विरोधी सहकार बचाव पॅनल यांच्यातच खरी लढत होत आहे.
शरद पवार यांच्या सहकार बळीराजा पॅनलकडून सभासदांशी संवाद साधला जात आहे. तसेच शेतकरी पॅनलकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. रविवार (दि. २२) रोजी मतदान आहे. तर मंगळवार (दि.२४) रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
माळेगावात सांगता सभा
माळेगाव साखर कारखान्याची श्री निळकंठेश्वर पॅनलची सांगता सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे जाधवराव कॉम्प्लेक्स, शनी मंदिर समोर, नीरा-बारामती रोड माळेगाव बुद्रुक येथे ५ वाजता होणार असल्याची माहिती बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजवर्धन शिंदे, श्री निळकंठेश्वर पॅनेलचे प्रचार प्रमुख केशवराव जगताप व कृषी उत्पन्न समितीचे माजी चेअरमन सुनील पवार यांनी दिली. सांगता सभेमध्ये अजित पवार हे आणखी कोणती घोषणा करणार याकडे माळेगाव सहकारी साखर कारखाना सभासद व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.





