पुणे जिल्हा : लौकी-मांजरवाडी रस्त्यावर खडीच खडी

प्रवासी त्रस्त, आंदोलनाचा इशारा : ठेकेदाराची मनमानी
रांजणी – लौकी ते मांजरवाडी (ता. आंबेगाव) रस्त्यावर जून महिन्यापासून खडी पसरवून ठेवण्यात आली आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा येत असून छोटे-मोठे अपघात घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दुचाकी स्वार त्रस्त झाले असून, त्वरीत रस्त्यावरील खडी दूर करा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी सरपंच संदेश थोरात व ग्रामस्थांनी यांनी दिला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर विभागामार्फत आंबेगाव पंचायत समितीकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. सुमारे 15 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, ग्रामपंचायत लौकी या एजन्सीला काम दिले आहे. यांच्यामार्फत उपठेकेदार म्हणून अमित थोरात यांना काम देण्यात आले. ठेकेदार थोरात यांनी रस्त्यावर सुमारे 400 मीटर खडी पसरून ठेवलेली आहे.
जून महिन्यापासून पसरलेल्या खडीमुळे येथे लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत, शेतात उत्पादित झालेला माल कळंब, मंचर बाजारपेठेत आणता येत नाही या रस्त्याच्या कामासाठी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यांचे पुढाकाराने 15 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, या कामात रस्त्याचे मजबुतीकरण रस्त्याच्या दुतर्फा गटर खोदाई खड्डे भरणे रस्त्याचे एक किलोमीटर डांबरीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे.
पंचायत समिती आंबेगावचे शाखा अभियंता यांच्या सांगण्यावरून काम सुरू करण्यात आले आहे.
– अमित थोरात, ठेकेदार
पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे डांबरीकरण केले जात नाही. संबंधित ठेकेदाराला त्वरित खडी उचलण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.
– पी. बी. रोकडे, शाखा अभियंता, पंचायत समिती बांधकाम विभाग
ठेकेदार निष्काळजीपणे काम करत आहेत, अशा ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागामार्फत माहिती घेण्यात येईल.
– प्रमिला वाळुंज, गटविकास अधिकारी, आंबेगाव पंचायत समिती





