पुणे जिल्हा : घोडेगावच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या दुधात सापडल्या अळ्या

मंचर : घोडेगाव ता.आंबेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या हवाबंद दुधाच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी गोहे येथे सोयाबीनच्या भाजीत अळ्या सापडल्याची घटना ताजी असतानाच आता दुधामध्ये अळ्या सापडल्या आहेत. सोयाबीनच्या भाजीमध्ये अळ्या सापडल्यानंतर दुधामध्ये अळ्या सापडण्याचा दुसरा प्रकार शनिवार, दि. ३ रोजी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घोडेगाव येथे इंग्रजी माध्यमाची आश्रम शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहारात नाश्त्यासाठी (हवा बंद डब्यात) दूध दिले जाते. विद्यार्थ्यांना दूध देण्यात आले असता त्यात दुधाच्या पॅकेटवर अळ्या आढळून आल्या. याबाबत विद्यार्थ्यांनी बिरसा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी यांना माहिती दिली असता प्रवीण पारधी, शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी डामसे, बिरसा ब्रिगेडचे उपाध्यक्ष दिनेश गभाले, मातृ शक्ती संघटनेच्या प्रमुख उमा मते, दत्ता वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यावेळी त्यांनी दुधाचे पॅकेट फोडून पाहिले असता त्यामध्ये जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत. तसेच त्या ठिकाणी असलेले इतर दुधाचे पॅकेटही फोडून पाहिले असता त्यामध्ये अळी आढळून आली आहे. सदर पॅकेट काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आली असून यात अळ्या दिसल्याने हे दूध विद्यार्थ्यांना दिले नसल्याचे येथील सहाय्यक अधीक्षकांनी सांगितले आहे.
दरम्यान काही दिवसापूर्वी गोहे आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणातील सोयाबीनच्या भाजीत अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्या प्रकरणातही बिरसा ब्रिगेडने आक्रमक होत या प्रकरणाचा तपास करून दोन अधीक्षकांना निलंबितही करण्यात आले होते. त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्न, नाश्ता मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती.
संबंधित विभागाने आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले अन्न दिले जाईल. याबाबत खात्री दिली होती. मात्र, खात्री दिली असतानाही त्यानंतर आता पुन्हा विद्यार्थ्यांना वाटप करणाऱ्या दुधात अळ्या सापडल्याने आश्रम शाळेतील मुलांच्या जेवणाबाबत स्थानिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, अधीक्षक, कर्मचारी हे उदासीन असल्याचे दिसून येते. हे दूध विद्यार्थी पिले नसली तरी हे दूध तपासणी करणे, त्याचे वाटप करताना पाहणी करणे हे काम स्थानिक अधीक्षक व कर्मचाऱ्यांचे असून या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांनी सांगितले.
अळ्या सापडल्यावर दूध परत घेतले
विद्यार्थ्यांना जे दूध वाटप करण्यात आले. त्या दुधाच्या पॅकिंगवरच काही अळ्या दिसल्याने मी तात्काळ विद्यार्थिनींना वाटलेले दुधाचे पॅकेट पुन्हा जमा केले. दुधात अळ्या असलेले दूध विद्यार्थी पिले नाही. पुन्हा विद्यार्थ्यांना दूध वाटप करण्यात आले नाही. असे महिला अधीक्षका नेहा उदरळ यांनी सांगितले.





