Pune District : निमसाखर येथील कोल्हापुरी बंधारा धोकादायक

जलसंपदा खात्याची वाहतुकीस सक्त मनाई
वालचंदनगर – निमसाखर (ता. इंदापूर) येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधार्याचे काही दिवसांपूर्वी पूरस्थितीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या बंधार्याची अवस्था पुरानंतर अत्यंत धोकादायक झाली आहे. जलसंपदा खात्याच्या अहवालानुसार, बंधारा जीर्ण व वापरासाठी अयोग्य ठरवण्यात आला असून, या बंधार्यावरून नागरिकांनी प्रवास करू नये, असा स्पष्ट इशारा आणि सक्त मनाईचा आदेश देण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निमसाखर हे गाव पाणी प्रश्नासाठी जागरूक गाव प्रसिद्ध आहे. पळसमंडळ नजीक असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्याची दुरवस्था व रस्त्यासाठी यापूर्वी शिवसेना इंदापूर तालुका (उबाठा गटाचे) संघटक सुदर्शन रणवरे यांनी जलसमाधी आंदोलन केले त्याला काहीसे प्रशासन पातळीवर यशही आले. गेले काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड ब्रेक अवकाळी पाऊस झाल्याने परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत होते.
याच काळात नीरा नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे पळसमंडळ नजीकच्या बंधार्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. नुकतेच संबंधित विभागाला देण्यात आलेल्या सूचना पत्रानुसार जलसंपदा खात्याच्या पत्रकाप्रमाणे बंधारा रस्ता हा केवळ ढापे बसवणे व काढणे जलसंपदा खात्यासाठी मर्यादित आहे, असे असून देखील निमसाखर व पळसमंडळ सह अन्य प्रवासी या परिसरातील या दुरवस्था झालेल्या पुलावरून स्थानिक वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब धोक्याची ठरू शकते. सध्या वीर धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पावसामुळे नीरा नदी धोक्याची पातळीवर विसर्ग सुरू आहे. यासाठी जलसंपदा खात्याकडून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीस सक्त मनाई करण्यात आले आहे. यासंदर्भात माळशिरस व इंदापूर येथील महसूल व पोलीस यंत्रणेकडे देखील पत्र पाठवण्यात आले आहे.
निमसाखर येथील बंधारा जलसंपदा खात्याने जीर्ण व धोकादायक दाखवला ही वस्तुस्थिती आहे. निमसाखर – पळसमंडळ भागातील शेतकरी विद्यार्थी प्रवासी दररोज या रस्त्याचा वापर करून ये-जा करत असतात, या मंडळींची काय सोय केली. आपली जबाबदारी दुसर्यावर झटकून नामानिराळे राहणारे हे अधिकारी आहे. बंधारा वापरावर बंदी करताना लोकांना जाण्यांचे अगोदर सोय करा नंतर बंद करा.
-सुदर्शन रणवरे, संघटक इंदापूर तालुका शिवसेना (ठाकरे)





