बारामतीत विविध उपक्रम : सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा होणार बारामती – अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करण्यात येत आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने किर्तावनी – वारी आडवाटंच्या विठोबाची या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नाटकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. स्वामीराज भिसे व ऋचिका खोत यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. वारकरी संप्रदाय आणि त्यांची महती संतांचे कार्य आणि समाजाला माहिती नसलेले संतांचे अनेक प्रसंग त्यांनी या नाटकातून प्रेक्षकांसमोर पोहोचवले. शेवटी सभागृहातील सर्व प्रेक्षकांनी उभा राहून नाटकाला दाद दिली. प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. भीमराव तोरणे, प्रा. राजेंद्र कंडरे, सोमनाथ कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ. अशोक काळंगे, रजिस्टर अभिनंदन शाह, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.