पुणे जिल्हा : दौंडज खिंडीत घाणीचे साम्राज्य

वाल्हे – पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंडीत (ता. पुरंदर) येथे मागील काही दिवसांपासून, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढत आहे. तसेच, कचरा मोठ्या प्रमाणात खिंडत टाकला जात असल्याने येथे घाणीचे साम्राज्य वाढत आहे. याचा ठिकाणी मागील काही दिवसांपासून विक्रीसाठी कापलेल्या कोंबड्या व टाकाऊ अवयव, हॉटेल किंवा औद्योगिक वसाहतीमधील कॅन्टींन मधील शिल्लक राहिलेले अन्न वैष्णवांच्या सकाळच्या न्याहाच्या परिसरात दौंडज खिंडीमध्ये उघड्यावर टाकले जात आहेत.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दि. 26 जून रोजी आगमन होणार आहे. खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात, वाल्मिकींच्या वाल्हे नगरीकडे दि. 27 जून रोजी मार्गस्थ होणार आहे.
पर्वत रागांच्या कुशीमधील दौंडज खिंडीमध्ये सर्व वैष्णव क्षणभर विश्रांती घेऊन, पुढे वाल्हे नगरीकडे मार्गस्थ होत असतात. या दौंडज खिंडीमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले घाणीचे साम्राज्य वैष्णवांच्या आरोग्यास धोकेदायक ठरू शकते.
दरम्यान, उघड्यावर फेकलेले, कॅन्टींन, हॉटेल शिल्लक अन्न खाण्यासाठी या परिसरात सतत कुत्र्यांची गर्दी असते. कुत्र्यांना येथे खाद्य मिळत असल्याने, अनेक कुत्री या परिसरात असतात. या दरम्यान कुत्र्यांची भांडणे होत असून त्यांच्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन, दुखापत होत आहे.





