जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन : आंबेगाव तालुक्यालाच दिले महत्त्व राजगुरूनगर – खेड तालुक्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यात खेड तालुक्यातील भोरगिरी परिसराचा समावेश करून विकास करावा, अशी मागणी खेड तालुक्यातील नागरिकांनी केली आहे, याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व भोरगिरीचे माजी सरपंच विठ्ठल वनघरे, संतोष भांगे आदी उपस्थित होते. निवेदनात नमूद केले आहे की, श्रीक्षेत्र भीमाशंकर हे भोरगिरी खेड तालुक्यात असून या देवस्थानच्या नावाखाली आलेला सर्व निधी आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी वापरला जातो आहे, त्यात खेड तालुक्याचा विचार का होत नाही? भीमाशंकर विकास आराखड्यात भोरगिरी येथील प्रवित्र कोटेश्वर भीमानदी घाट, भोरगडाचा विकास महत्त्वाचा असून त्यासाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे, भीमाशंकर ते भोरगिरी हे अंतर केवळ 5 किलोमिटर आहे. दरम्यान, येथे भीमानदी उगमस्थान, गुप्त भीमाशंकर व साक्षी विनायक अशी विशेष पौराणिक स्थाने आहेत. या स्थानांचा विचार करण्यात यावा, भीमाशंकर देवस्थानची कार्यकारिणी बरखास्त झाली असून एवठे मोठे देवस्थान असुनही देवस्थानल अध्यक्ष नाही. कार्यकारणही लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेस देवस्थानच्या मिटींग आंबेगाव तालुक्यातच का होतात? नव्यानं तयार होणारा रस्ता कारकुडी मार्गे आंबेगाव तालुक्यातून भीमांशकरला का? हा मार्ग टोकावडे भोगिरी – भिमांशकर असाच व्हायला हवा, असे नमूद केले आहे. राजकारण विकासाला आडवे भीमाशंकर हे भोरगिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. भीमाशंकरसह इतर अनेक ठिकाणे ही भोरगिरी परिसरात आहेत पर्यटनाच्या दृष्टीने आणि स्थानिकांना रोजगाच्या दृष्टीने आतापर्यंत या भागाचा विकास होणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही कधीकधी खेड-आंबेगाव तालुक्यातील राजकारण विकासाला आडवे आले. त्यामुळे खेड भोरगिरी परिसराचा विकास मागे पडला. खेड तालुक्यात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. ते खेड तालुक्यात आहे; मात्र त्याचा उर्वरित परिसर आंबेगाव तालुक्यात येतो. आतापर्यंत विकास आराखड्यात केवळ आंबेगाव तालुक्यातील भागाचा विकास झाला आहे. खेड तालुक्यात असलेली महत्त्वाची ठिकाणे विकासापासून दुर्लक्षित आहेत. त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. नुकताच भीमाशंकर आराखडा मंजूर झाला असून तब्बल 288 कोटींचा निधी मंजूर झाला आहे; मात्र त्यामध्ये खेड तालुक्याच्या बाजूकडे अगदी नगण्य समावेश केला आहे.