Pune District : खेड पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारतीचे काम दर्जाहीन

आमदार बाबाजी काळे यांनी केली पाहणी ः दोन्ही शिनवसेनेचा आंदोलनाचा इशारा
राजगुरुनगर – खेड पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम दर्जाहीन होत आहे. या कामाकडे जिल्हा परिषदेच्या व खेड पंचायत समितीच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याने ठेकेदार कामात कुचराई करीत असून काम निकृष्ट व दर्जाहीन केले जात आहे. त्यात सुधारणा झाली नाही तर वेळप्रसंगी काम थांबवण्यात येईल. जनआंदोलन केले जाईल, असा इशारा ठाकरे गटाचे खेडचे आमदार बाबाजी काळे व शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी दिला आहे.
राजगुरूनगर येथे खेड पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. 14 सप्टेंबर 2019 रोजी या कामाचे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते; मात्र भूमिपूजन झाल्यापासून हे काम रेंगाळले. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणूक झाल्या त्यात आमदार म्हणून दिलीप मोहिते पाटील निवडून आले. त्यानंतर येथील प्रशासकीय इमारतीच्या जागेला त्यांनी विरोध केला. त्या जागेत सर्व कार्यालये एकत्र आणण्यासाठी प्रशासकीय इमारत बांधण्याचा आग्रह धरला. त्यामुळे भूमिपूजन झालेल्या पंचायत समितीच्या पुढील जागेत इमारत बांधण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. माजी आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली 14 फेब्रुवारी 2020 रोजी मोठे आंदोलन करण्यात आले.
पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी सुधारित तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम 2 वर्षांपूर्वी सुरु झाले. सत्ता संघर्षात ते धीम्या गतीने सुरु आहे. हे काम तिसर्या मजल्यावरपर्यंत झाले आहे. तिसर्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र त्या खालील स्लॅब केल्यानंतर त्याला पाणी मारले नसल्याने त्याला चिरा गेल्या आहेत. त्यातून गळती होत आहे. पिलर मधील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. विटा, वाळू कमी दर्जाची वापरली जात आहे. स्थानिक नागरिकांनी पाहणी केल्यानंतर हि बाब पुढे आली आहे.
आज (दि. 21)आमदार बाबाजी काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, तालुका प्रमुख निलेश पवार यांनी पंचायत समितीच्या अधिकारी समवेत पाहणी केली. पाहणी नंतर त्यांनी कामाबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांचे या कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. स्व. सुरेश गोरे यांचे हे स्वप्न होते. ही इमारत बांधण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. 13 कोटींचा निधी मिळाला. इमारतीची कामे मूळ ठेकेदाराने इतर ठेकेदारांना वाटून दिली आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले.
या इमारतीची पाहणी केल्यानंतर त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. स्लॅबला तडे गेले, चिरा पडल्या आहेत, पाणी गळती होत आहे. बीम मधून पाणी लिकेज होत आहे. इमारत निकृष्ट दर्जाची होत आहे. ठेकेदार साठे यांचे कामाकडे लक्ष नाही त्यांनी कामाचा दर्जा न तपासता कामाचे पैसे कसे दिले याबाबत जिल्हापरिषदेच्या अधिकार्यांना जाब विचारणार आहे. ही इमारत तालुक्याचे वैभव होणार आहे आणि तिचे बांधकाम असे दर्जाहीन निकृष्ट होणार असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही.
-बाबाजी काळे, आमदार खेड
पत्रकारांनी या कामाची पाहणी केल्यानंतर प्रशासनाला जाग आणली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्व. आमदार सुरेश गोरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी 13 कोटी रुपयांचा निधी दिला. कामाचे ठेकेदार, अधिकारी यांनी हे काम चांगले केले पाहिजे. या कामाबाबत विधानसभेत आवाज उठवण्याचा इशारा दिला आहे या कामाची पुन्हा अधिकारी ठेकेदार यांच्याबरोबर पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
-भगवान पोखरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख





