Pune District : खेड न्यायालयाने केली 26 आरोपींची निर्दोष मुक्तता

राजगुरूनगर : पाईट (ता.खेड) येथे दि 16 फेब्रुवारी 2012 रोजी घडलेल्या घटनेतील 26 आरोपींना खेड (राजगुरूनगर) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी निर्दोषमुक्त केले असल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. सचिन आरुडे यांनी दिली.
पाईट गावात 13 वर्षांपूर्वी रस्त्यावर एका व्यक्तीचा पघाती मृत्यू झाला होता. नुकसानभरपाई मिळावी यासाठी नातेवाइकांनी अपघात घडला त्या ट्रकचालकाकडे आर्थिक मोबदल्याची मागणी केली होती. त्यावेळी गावातील इतर लोकांनी सुद्धा आर्थिक मदतीसाठी ट्रकचालकाकडे तगादा लावला. त्यावरून गावकरी यांनी दंगल केली व पोलिसांना धक्काबुक्की केली होती. सरकारी कर्मचार्यांच्या गाड्या फोडल्या. अपघात केलेले ट्रक वाहन पेटवून दिले, अशी तक्रार चाकण पोलीस ठाण्यात दिली होती. दंगलसदृश्य गुन्हा दाखल झाल्याने गावकरी व नातेवाईक हवालदिल झाले होते. राजगुरूनगर सत्र न्यायालयात 2014 पासून म्हणजे तब्बल 12 वर्षे हा खटला सुरू होता.
दरम्यानच्या काळात यातील काही आरोपी मृत पावले. पोलिसांनी जवळपास 400च्या जमावाने हल्ला केल्याची नोंद केली होती. प्रत्यक्षात 22 पुरुष आणि 4 महिला अशी आरोपींची संख्या होती. न्यायालयात या घटनेचा एकही प्रत्यक्षदर्शी नसल्याने न्यायालयाने या सर्वांना निर्दोष मुक्त केले.
आरोपींच्या वतीने अॅड. सचिन बाळासाहेब आरुडे व अॅड. प्रसाद हुलवळे यांनी 18 तर उर्वरीत इतर आरोपींच्या वतीने अॅड. संजय दळवी, अॅड. सुनील सांडभोर, अॅड. महेश गोगावले यांनी कामकाज पाहिले. सरकारी वकील अॅड. एम. डी. पांडकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला. सर्व आरोपीं विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने अॅड. सचिन आरुडे, अॅड. प्रसाद हुलवळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सय्यद यांनी मंगळवारी (दि 13) सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.





