Pune District: खडकवासला कालव्याचे आवर्तन बंद

कळस : खडकवासला कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन इंदापूर तालुक्यात पोहचते ना पोहोचते तोवरच अचानक बंद करण्यात आल्यामुळे तालुक्याच्या शेकडो एकर शेतीला धोका निर्माण झाला आहे. येथील लाभधारक शेतकर्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी आज पाण्याविना होरपळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एरव्ही हवेली, बारामती, दौंड या तालुक्यांत मुबलक प्रमाणात पाणी दिले जाते; पण इंदापूरला मात्र दरवेळी वार्यावर सोडले जाते, असे का? आम्ही पण माणसं आहोत आम्ही पण कष्ठाने शेती करत आहोत; मग इंदापूरच्याच वाट्याला हा अन्याय का? असा संतप्त सवाल येथील लाभधारक शेतकर्यांमधून उपस्थित केला जात आहे.
हवेली, दौंड आणि बारामती या तिन्ही तालुक्याला मुबलक पाणी दिले जाते. फक्त इंदापूरला टाळले जाते. दौंड तालुक्यातील उसासारखी नगदी पिके कांद्याच्या पातीसारखी हिरवीगार आहेत आणि इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावर अवलंबून असणारे शेतकर्यांची पिके करपून गेलेले आहेत हा फार मोठा दुजाभाव असल्याचे लाभधारक शेतकर्यांमधून बोलले जात आहे.
संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी दौंड, हवेली, बारामती तालुक्यात कारवाई करत नाहीत. खर्या अर्थाने पाठीमागच्या तिन्ही तालुक्यात कार्यवाही होणे गरजेचे आहे. पाठीमागचे पाणी बंद केलं तर पुढे टेलला पुरेशा प्रमाणात पाणी येईल. पण असं न होता इंदापूर हद्दीत पाणी आले की इंदापुरातील शेतकर्यावरच कार्यवाही होते. कुठल्याही वितरिकेला पाणी सोडले जात नाही हा मोठा अन्याय आहे. त्यामुळे खरंतर इंदापूर तालुक्यातील पाण्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्याला दरवेळी खडकवासला कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या अवर्तना पासून वंचित ठेवण्यामागे जर कोणी राजकीय भूमिका घेत असेल, तर ती अत्यंत घातक असून, त्याला शेतकर्यांनी आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. आता शांतपणे सहन करणं थांबवून संघर्षाची तयारी करावी लागेल. असा इशाराही येथील लाभधारक शेतकर्यानी दिला आहे.
इंदापूरसाठी दुजाभाव का?
दौंड, हवेली, बारामती या तिन्ही तालुक्यांमध्ये जिथे तीन अश्वशक्तीचा पाणी उपसा करण्याचा परवाना ज्या लाभधारकांना आहे. त्या ठिकाणी साडेसात एचपीचा पंप, 10 एचपीचा पंप, पाच एचपीचा पंप वापरून पाणी उपसा केला जातोय. त्या ठिकाणी संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी कारवाई करीत नाहीत. या पाठीमागे त्यांचा हेतू काय असतो. अवैधरित्या पाणी उपसा करणारे धंद्यावाले आहेत, कंपनीवाले आहेत. कारखानदारी वाले आहेत. त्यांना नियम वेगळा आणि इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांना नियम वेगळा असा दुजाभाव का? असाही संतप्त सवाल येथील लाभधारक शेतकर्यांमधून उपस्थित होत आहे.





