पुणे जिल्हा : ई-फेरफार प्रणालीला कात्रजचा घाट

हवेलीतील तलाठी सजात 187 ई-म्युटेशन दस्त नोंदीला ब्रेक
संदीप बोडके
थेऊर – लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गाव कामगार तलाठ्याने पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत एकही ई-म्युटेशनची फेरफार नोंद घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या तलाठी सजात एकूण 187 ई-म्युटेशन दस्त नोंदीला ब्रेक लागला आहे. यामुळे खातेदार हवालदिल झाले आहेत. नोंदणीकृत दस्ताच्या फेरफार नोंदीसाठी खातेदारांच्या तलाठी कार्यालयात चकरा सुरू झाल्या आहेत.
हवेली तालुक्यात ई-म्युटेशनद्वारे दस्तनोंदणी झालेल्या 2426 नोंदी तलाठ्यांनी घेतल्याच नाहीत. तसेच मंडलाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून पंधरा दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही अनोंदणीकृत 691 फेरफार नोंदी व नोंदणीकृत 371 फेरफार नोंदी निर्गतीकामी प्रलंबित ठेवल्याचे कार्यालयीन आकडेवारीनुसार दिसत आहे. त्यामुळे नोंदणीकृत ई-फेरफार प्रणालीला काही तलाठ्यांनी स्पीड ब्रेकरचा अडथळा निर्माण केला आहे.
महाराष्ट्र राज्यात नोटीस बजावून पंधरा दिवसांत फेरफार निर्गत होण्याचे प्रमाण 32 दिवस आहे तर हवेली तालुक्यात फेरफार निर्गतीचे प्रमाण 84 दिवस आहे. हवेली तालुक्यात फेरफार तयार करण्यासाठी उपस्थित होऊन एक महिन्यात न झालेल्या फेरफारांची संख्या 993वर पोहचली. दोन महिने होऊनही फेरफार न घेतलेली संख्या 692 आहे.
तर तीन महिने व त्यापेक्षा जास्त दिवस तलाठ्यांनी ई म्युटेशन फेरफार नोंदी न घेतलेल्यांची संख्या 741 वर पोहचल्याने सुमारे 2426 फेरफार नोंदीना तलाठ्यांनी ब्रेक लावल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ई-म्युटेशन होऊनही फेरफार नोंद होत नसल्याने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी मासिक बैठकीत खरोखरच याचा आढावा घेणार का? याकडे लक्ष लागले आहे.
“आमच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे एक सप्टेंबरला रजिस्टर वाटपपत्राचा दस्त ई-म्युटेशन दस्त नोंदणीच्या आधारे केलेला आहे. त्यानतंर आपली चावडीवर अजून फेरफार नोंद वडकी तलाठी यांनी घेतलेली नाही. याविषयी सात ते आठ चकरा तलाठी कार्यालयात मारलेल्या आहेत. दोन दिवसांत फेरफार होईल, असे उत्तर तलाठ्यांकडून देण्यात येते. याबाबत रजा राखीव उपजिल्हाधिकारी यांच्याकडे समक्ष भेटून लेखी तक्रार केली आहे. त्यांनी हवेलीचे महसूल नायब तहसीलदार यांना भेटण्यास सांगितले आहे.”
– सत्यवान चव्हाण, शेतकरी वडकी





