Pune District : कळमोडीला गती हवी

योजनेच्या तांत्रिक बाबींची तातडीने पुर्तता व्हावी – टाव्हरे
राजगुरूनगर – कळमोडीचा सुप्रमा व फेरजलनियोजनासाठीचा सुधारित अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत असून कळमोडी योजनेच्या तांत्रिक बाबींची तातडीने पुर्तता व्हावी, अशी मागणी अध्यक्ष कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक टाव्हरे यांनी केली आहे.
कळमोडी उपसा योजनेचे सुप्रमा तसेच फेरजल नियोजन प्रस्तावाच्या सद्यस्थितीचा अहवाल कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांच्या मागणीनुसार भामा आसखेड धरण विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एस. करे यांनी अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांना मंगळवारी (दि. 1) सादर केला आहे.
कळमोडी प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात मुळच्या 5065 हेक्टर क्षेत्रासह वाढीवमध्ये 1557 असे एकूण 6622 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. वाढीव गावांमध्ये खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरूडे, वाफगावमधील 1252 हेक्टर व भीमाशंकर आदिवासी उपसा सिंचन योजनेतील कुडे व एकलहरे गावांतील 305 हेक्टर क्षेत्र आहे.
कळमोडी प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर गेली 28 वर्षे उपसा योजना मात्र पूर्ण होऊ शकली नाही. वाढीव गावे समाविष्ट करून पुन्हा मान्यता पाच वर्षांपूर्वी नाकारली होती. आता ऑक्टोबर 2023 मध्ये वाढीव गावे प्रस्तावित केली; परंतु तांत्रिक बाबींची पुर्तता जलसंपदा विभागाने तातडीने करून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मान्यता व सुप्रमा मंजुरी होऊन योजनेला गती दिले पाहिजे, असे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.





