पुणे जिल्हा : तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात कलश पूजन

पूर्व हवेलीतील १९ गावांना कलशाचे वितरण
लोणी काळभोर- ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, ”सियावर रामचंद्र की जय”, “प्रभू श्री रामचंद्रकी जय” ”जय श्री राम” अशा जयघोषात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात अक्षदा कलशाचे विधीवत पूजन १००८ श्री हेमंत पुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूर्व हवेलीतील १९ गावांना कलशाचे वितरण करण्यात आले.
अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येत येण्यासाठी रामभक्तांना निमंत्रण देण्यासाठी अक्षता अभिमंत्रित करून अक्षता कलश लोणीकाळभोर येथील रामदरा शिवालयात आणण्यात आला होता. कलशांचे समरसता यज्ञ करून विधिवत पूजन करण्यात आले.
हिंदू धर्मातील विविध संप्रदायांतील एकेका दाम्पत्यास प्रातिनिधिक स्वरूपात यज्ञाला बसविण्यात आले. पुरुषांनी हे अक्षता कलश डोक्यावर घेऊन श्रीराम मंदिरात आणले. साधू-संतांनीही कलशांचे पूजन केले. रामदरा शिवालय परिसरातून या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत प्रभू श्रीरामांची मूर्ती, सनई, बँड, चौघडे तसेच भगवे ध्वजधारी रामभक्त सहभागी झाले होते. दरम्यान, हनुमान चालीसा पठण, श्री रामाचे, हनुमानाचे नामस्मरण, जयघोष व आरती करण्यात आली.
रामदरा शिवालय ट्रस्टच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्व हवेलीतील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून कलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा अक्षदा कलश पूर्व हवेलीतील मांजरी, शेवाळेवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, पेठ, नायगाव, आळंदी म्हातोबाची, वळती, तरडे, शिंदवणे, सोरतापवाडी, उरुळी कांचन, टिळेकर वाडी, खामगाव टेक, भवरापूर, कोरेगाव मूळ, प्रयागधाम या १९ गावांमध्ये वितरीत करण्यात आला आहे.
कलश घरोघरी जाणार
तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय, लोणी काळभोरचे श्री हेमंत पुरी महाराज म्हणाले की, कलशाचे भाविकांना ३१ डिसेंबरपर्यंत दर्शन मिळणार आहे. त्यानंतर हा कलश घरोघरी जाणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा दि. २२ जानेवारीला पार पडल्यानंतर सर्व राम भक्तांनी आपापल्या जवळच्या राम मंदिरामध्ये जाऊन अक्षदा अर्पण करायचा आहे.





