Pune District : कडेपठाराव खंडोबा देवाचा गणपूजा उत्साहात

गाभारा फुला पानांनी सजवला
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणार्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असणारा गणपूजा उत्सव कडेपठार गडावर मध्यरात्री अत्यंत धार्मिक विधीमध्ये साजरा करण्यात आला.
पौराणिक काळात पृथ्वीलोकावर मातलेल्या मनी आणि मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी जेजुरीच्या जयाद्री डोंगर रांगेतील कडेपठार येथे मार्तंड भैरवाच्या म्हणजेच खंडोबाच्या रूपाने अवतार घेतला. मार्तंड म्हणजे सूर्य, सुर्यासारखा तेजस्वी आणि उग्र रूप असल्याने कडेपठार येथे देव गणांनी मार्तंड भैरवाची भंडारा व फुलांनी पूजा केली. दिपीकेने (दिवटी) देवांना ओवाळले अशी ही पौराणिक आख्यायिका असून बोध बुधली, ज्ञान दिवटी, लावीयली दारोदारी 15व्या शतकातील संत एकनाथ महाराजांच्या ओवीतही असा उल्लेख आहे.
ऋषीगणांच्या पौराणिक काळापासून ते आत्ता पर्यंत आषाढ शुद्ध प्रतिपदेला कडेपठार मंदिरात खंडोबा देवाची भंडाराने पूजा केली जात आहे. बुधवारी (दि. 25) मध्यरात्री कडेपठार मंदिरात खंडोबा देवाची मानाच्या पूजा झाल्या. हजारो भाविकांनी देवाला भंडार अर्पण केला. या भंडाराच्या राशीवर फुलांची पूजा करण्यात आली.
मध्यरात्री गडावर छबिना तसेच वाघ्या मुरुळी व स्थानिक लोक कलावंतांनी देवाचा जागर करण्यात आला. गुरुवारी (दि. 26) पहाटे भंडा-याचा प्रसाद वाटून गणपूजा उत्सवाची सांगता झाली. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ, पुजारी, मानकरी, सेवेकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





