पुणे जिल्हा : ज्योतिर्लिंग, ज्योतिबाच्या उत्सवमूर्तींना नीरा स्नान

गुळुंचेत आज काटेबारस यात्रा : 12 दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
नीरा – काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेलया गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ज्योतिर्लिंग मंदिरात यात्रा उत्सव सुरु आहे. प्रथेप्रमाणे शुक्रवारी (दि. 24) बाराव्या दिवशी मुख्य यात्रा होणार आहे. गुरुवारी (दि. 23) कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे देवाची काठी, श्री ज्योतिर्लिंगाच्या तसेच ज्योतिबाच्या उत्सवमूर्तींना भाविकांनी भक्तिमय वातावरणात नीरा नदीच्या दत्त घाटावर स्नान घातले.
ज्योतिर्लिंग मंदिरात मागील 12 दिवसांपासून सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, भजन, कीर्तन, 11 दिवस चालणारा छबिना तसेच 12 दिवसांच्या उपवासाची सांगता शुक्रवारी काटेमोडवणाने होणार आहे. प्रथेप्रमाणे बुधवारी (दि. 22) रात्री देवची बहिण समजली जाणरी मानाची काठी फरांदेवस्तीत आरतीनंतर मारुती मंदिराशेजारी आली. फरांदे व बारवकर परिवाराने काठीची सजावट करतात. ायबाचावाडा येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे स्वागत केले गेले. यावेळी पालखी व मानाची काठी गावातील सर्व भागातून फिरविण्यात आली.
ठिकठिकाणी पालखीचे फुलांच्या पायघड्या व आकर्षक रांगोळ्या काढून, फटाक्यांची आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. घरापुढे महिलांनी पालखीतील उत्सव मूर्तींची पूजा केली. नगरप्रदक्षिणेसह छबिन्याचा कार्यक्रम पहाटे 2.30 वाजेपर्यंत सुरू होता. गुरुवारी सकाळी अभिषेक व आरती झाल्यानंतर ग्रामस्थ, यात्रा कमिटीचे पंच तसेच भाविकांनी दहा वाजता ढोल ताशाच्या गजरात पालखी मंदिराबाहेर काढली.
कर्नलवाडी येथून ज्योतीबा देवाची पालखी रथातून आल्यानंतर गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग महाराज व मानची काठी सहवाद्य रथातून नीरेकडे निघाल्या. नीरा स्नानासाठी पालखी बरोबर नीरा, गुळुंचे, कर्नलवाडी व बारा वाड्यावस्त्यांवरुन भाविक सहभागी झाले होते.
पारंपरिक गूळ, शेंगदाण्याचा प्रसाद
नीरा नदीच्या स्नानानंतर दत्तघाटावर महाआरती करण्यात आली. यावेळी पारंपरिक गुळ शेंगदाण्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. प्रसिद्ध वालचंद सराफ यांच्या पेढीसमोर काही काळ विसावा घेण्यात आला. या दरम्यान समर्थ पतसंस्थेने चहा वाटप केले. मुळचे गुळुंचे येथील लोक पण वास्तव्यास नीरा शहरात असलेल्या गुळुंचकरांनी पालखी रथाचे स्वागत केले. फुलांच्या व रांगोळ्यांच्या पायघड्यांनी रथातील मानची काठी व पालखीतील दोन्ही उत्सव मूर्तींचे औक्षण करुन पूजन केले.





