Pune district : जुन्नर ‘सहकार भूषण’ पुरस्कार वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेला प्रदान

जुन्नर – सहकार क्षेत्रामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जुन्नर ‘सहकार भूषण’ पुरस्कार समारंभात जुन्नरमधील वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेला प्रदान करण्यात आला. सतत ‘अ’ वर्ग लेखापरीक्षण आणि एक टक्का थकबाकीच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे २५ ते ५० कोटी ठेवींच्या गटात या पतसंस्थेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
राज्याचे सहकार अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, जुन्नर सहायक निबंधक गजेंद्र देशमुख, जुन्नर सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके, उपाध्यक्ष गुलाब नेहरकर, भास्कर बांगर, महादेव वाघ आदींच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वल्लभ पतसंस्थेच्या अध्यक्ष उज्वला शेवाळे, उपाध्यक्ष बिहारीलाल परदेशी, संचालक नरेंद्र कासार, सुहास चिखले, वैष्णवी चतुर, विलास कडलक, दत्तात्रय म्हस्के, सुमित परदेशी आणि व्यवस्थापक राजेंद्र परदेशी यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
सन १९८९ मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जुन्नर तालुका आहे. संस्थेचे ८ हजार ६०० सभासद असून ३२ कोटींच्या ठेवी आहेत. संस्थेचे लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ कायम असून थकबाकीचे प्रमाण केवळ १ टक्का इतके आहे.
लेखापरीक्षण अहवालात, सोने तारण कर्ज देणारी ही एक नंबरची पतसंस्था असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन २५ ते ५० कोटी ठेवींच्या गटात पहिल्या क्रमांकाचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार वल्लभ पतसंस्थेला प्रदान करण्यात आला.





