पुणे जिल्हा : जेजुरीनगरी भगवीमय; जय श्रीरामच्या घोषणा

खंडेरायाचा मुख्य गाभारा पानाफुलांनी सजवला
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव असलेली खंडेरायाची सोनपिवळी जेजुरीनगरी भगवीमय होत जय श्रीराम असा जयघोष करीत दुमदुमून गेली होती.
खंडेरायाचा मुख्य गाभारा पानाफुलांनी सजविण्यात आला होता. विधिवत पूजा-अभिषेक, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजनासह बुंदी प्रसाद वाटप करण्यात आले. तत्पूर्वी रविवारी (दि. 21) सायंकाळी श्री खंडोबा मंदिर गडकोट आवारात मार्तंड देव संस्थानकडून 1500 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
खंडेराम मंदिरात सोमवारी (दि. 22) पहाटेच्या सुमारास ग्रामस्थ, मानकरी, खांदेकरी, देवसंस्थान विश्वस्त, कर्मचार्यांच्या हस्ते श्री खंडोबा मंदिरामध्ये महापूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के महापूजेला उपस्थित होते.
महापूजा महाआरथी झाल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्ती मुख्य मंदिरासमोर विराजमान करून महाआरती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांकडून दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच कलासिद्धी नृत्यलय सासवड यांचे विद्यार्थिनींनी प्रभू श्रीरामांना कथक नृत्यद्वारे वंदना दिली. दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामांची आयोध्या येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतेवेळी श्री खंडोबा मंदिरामध्ये घंटानाद करण्यात आला.
श्री खंडोबा मंदिर गडकोट आवारासह जेजुरी शहरातील सर्व मंदिरांना देखील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. श्री खंडोबा व श्री म्हाळसादेवी यांचा शुभविवाह पाली या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून प्रभू श्रीरामांची तिची प्राणप्रतिष्ठापना आयोध्या येथे केली जाणार आहे.
नेमका आज दुग्ध शर्करा योगच मानला पाहिजे. श्री मार्तंड देवस्थान तर्फे दुपारी प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलेले होते. तसेच श्री खंडोबा मंदिरामध्ये बुंदी प्रसाद देखील वाटप करण्यात आला आहे.





